मकाऊ बॅडमिंटन स्पर्धा

वर्षअखेरीस दुबई येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेच्या तयारीसाठी ऑलिम्पिक पदकविजेत्या पी.व्ही. सिंधूने मकाऊ सुपरसीरिज स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत असणाऱ्या सायना नेहवालवर भारतीय चाहत्यांच्या आशा केंद्रित झाल्या आहेत.

सिंधूने नुकत्याच झालेल्या हाँगकाँग ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते. मकाऊ स्पर्धेत सायना आणि सिंधू समोरासमोर येण्याची शक्यता होती. मात्र पहिल्यांदाच सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार असल्याने तयारीसाठी सिंधूने या स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला. या स्पर्धेत सिंधूने गेल्यावर्षी जेतेपदाची कमाई केली होती. हारजीत हा मुद्दा नाही पण तयारीला पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. म्हणून हा निर्णय घेतला असे सिंधूच्या वडिलांनी सांगितले.

सायनाला अग्रमानांकन मिळाले आहे. सायनाला चीन ओपन स्पर्धेतील पहिल्या फेरीत हार पत्करावी लागली होती, तर हाँगकाँग ओपन स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. सायनाला पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या हना रामादिनी हिच्याशी खेळावे लागणार आहे.

पुरुषांच्या विभागात राष्ट्रीय विजेता समीर वर्मा याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने हाँगकाँग स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल गाठली होती. त्याला चेक प्रजासत्ताकचा खेळाडू मिलान ल्युडिक याच्याशी खेळावे लागणार आहे. डेन्मार्क ओपन स्पर्धेनंतर विश्रांती घेणाऱ्या पारुपल्ली कश्यप या स्पर्धेद्वारे पुनरागमन करीत असून त्याला मलेशियाच्या गुओ झेंग सिम याच्याशी खेळावे लागणार आहे. एच.एस.प्रणॉयला सातवे मानांकन मिळाले असून त्याच्यापुढे चुन वेईचेनचे आव्हान असणार आहे. तृतीय मानांकित किदम्बी श्रीकांत याला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे बी.साईप्रणीतला लाम होऊहिम याच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. मिश्रदुहेरीत ज्वाला गट्टा व मनु अत्री सहभागी होणार आहेत.