दुसऱ्या फेरीत पी. व्ही. सिंधूच्या आव्हानाची शक्यता
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदक पटकावल्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या भारताच्या सायना नेहवाल हिला जपान सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद खुणावत आहे. गतमहिन्यात जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत २५ वर्षीय सायनाने रौप्यपदक पटकावून इतिहास घडविला. रौप्यपदक पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
बुधवारपासून सुरू होणाऱ्या जपान सुपर सीरिज स्पध्रेत दुसऱ्या मानांकित सायनासमोर पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानान आँगबुम्रुगपनचे आव्हान आहे. मात्र दुसऱ्या फेरीत तिच्यासमोर भारताच्याच पी.व्ही. सिंधूचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. सिंधूला पहिल्या फेरीत जपानच्या मिनात्सु मितानीचा सामना करावा लागणार आहे. सायना आणि सिंधू यांच्यातील कारकिर्दीतील हा दुसरा सामना ठरेल. यापूर्वी २०१४मध्ये भारत ग्रा. प्रिं. सुवर्ण चषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत या दोघी समोरासमोर आल्या होत्या.
पुरुष एकेरीत राष्ट्रकुल स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपसमोर जपानच्या ताकुमा उएडाचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या कश्यपने यापूर्वी दोनवेळ ताकुमाला पराभूत केले आहे, परंतु २०१३च्या सिंगापूर खुल्या स्पध्रेत ताकुमाने विजय मिळवला होता. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला किदम्बी श्रीकांत आर्यलडच्या स्कॉट इव्हान्सविरुद्ध खेळणार आहे, तर अजय जयराम सातव्या मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सल्सेनशी दोन हात करेल.
एच. एस. प्रणॉयसमोर हाँगकाँगच्या वाँग विंग की विन्सेंटचे आव्हान आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जॅन ओ जोर्गेसेन याने पोटदुखीमुळे माघार घेतल्याने भारताच्या बी. साई प्रणिथचा मुख्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे.
महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी भारताला पदक मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे. कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या गट्टा व पोनप्पा या जोडीसमोर आठव्या मानांकित झाओ युन्लेई आणि झाँग क्विन्क्सीन या चिनी जोडीचे आव्हान आहे, तर प्रज्ञा गद्रे आणि एन. सिक्की रेड्डी यांना जपानच्या अव्वल मानांकित मिसाकी मात्सुतोमो व अयाका तकाहाशीचा सामना करावा लागणार आहे.