इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील उपविजेती सायना नेहवाल आणि गतविजेती पी. व्ही. सिंधू या भारतीय खेळाडूंना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडिया खुली सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्पुरुष गटात श्रीकांत किदम्बी हंगामाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. २०१४ मध्ये किदम्बीने ही स्पर्धा जिंकली होती.

सायनाने २०१५मध्ये इंडिया खुली सुपर सीरिज स्पर्धा जिंकली होती आणि दुखापतीनंतर यंदाच्या हंगामात पहिल्याच स्पर्धेत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच उपविजेतेपदाबरोबरच तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झोकात पुनरागमन केले. २०१७च्या हंगामात सायनाला दुखापतीमुळे अनेक स्पर्धामधून माघार घ्यावी लागली होती, मात्र इंडोनेशिया मास्टर्समध्ये तिने दमदार खेळ केला.

नवी दिल्ली येथील सिरी फोर्ट क्रीडा संकुलात होणाऱ्या स्पर्धेत चौथ्या मानांकित सायनाला डेन्मार्कच्या सोफी डॅहलचा सामना करावा लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर पाचव्या मानांकित बैवेन झँगचे आव्हान अपेक्षित आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदकानंतर फॉर्मात असलेल्या सिंधूसमोर डेनर्माच्या नतालिया रोहडेचे आव्हान आहे. स्पर्धेतील घोडदौड कायम राखण्यास उपांत्य फेरीत तिच्यासमोर माजी विश्वविजेत्या रॅटचानोक इंटानोनचे कडवे आव्हान असणार आहे.

पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेयूक यियूचा सामना करावा लागणार आहे. सिंधूने सुरुवातीचे अडथळे पार केल्यास अंतिम फेरीत त्याला माजी विजेत्या अ‍ॅक्सेल्सनशी झुंजावे लागेल. जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावर असलेल्या एच. एस. प्रणॉय, बी. साई प्रणीत, पारुपल्ली कश्यप आणि अजय जयराम यांच्यावर पुरुष एकेरीत मदार असणार आहे. पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज रनकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत या जोडीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यांच्याशिवाय बी. सुमीत रेड्डी आणि मनू अत्री ही राष्ट्रीय विजेती जोडी भारताचे आव्हान सांभाळणार आहे.