चीनच्या खेळाडूचे कोणतेही दडपण घेतले नाही तर विजय आपोआपच मिळू शकतो याचाच प्रत्यय भारताची सुपरस्टार सायना नेहवाल हिने येथे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत दाखविला. तिने चीनच्या सून यू हिच्यावर २१-१३, २१-१३ अशी मात करीत अंतिम फेरी गाठली.
बॅडमिंटन क्षेत्रात ऑलिम्पिकखालोखाल ऑल इंग्लंड स्पर्धेस महत्त्व दिले जाते. त्यामुळेच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाच्या कामगिरीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. तिने प्रथमच या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनची खेळाडू वाँग यिहान हिच्यावर २१-११, १९-२१, २१-१३ असा रोमहर्षक विजय मिळविला होता. वाँगविरुद्ध गेल्या दोन वर्षांत तिचा हा पहिलाच विजय आहे. हा सामना जिंकल्यानंतर मनोधैर्य उंचावलेल्या सायनाने सून हिच्याविरुद्ध अव्वल दर्जाचा खेळ करीत वर्चस्व गाजविले.
केवळ ५० मिनिटांमध्ये सायनाने सून हिला पराभूत करताना स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांबरोबरच कॉर्नरजवळील प्लेसिंग व अचूक सव्‍‌र्हिस असा बहारदार खेळ केला. तिने दोन्ही गेम्समध्ये आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर दडपण ठेवण्यात यश मिळविले. तिने केलेल्या आक्रमक व चतुरस्र खेळापुढे सून हिचा खेळ निष्प्रभ ठरला. भारताच्या प्रकाश पदुकोन यांनी १९८० मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळवीत पहिला भारतीय विजेता होण्याचा मान मिळविला होता. पुल्लेला गोपीचंद यांनी २००१ मध्ये या स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते. त्यानंतर सायना हिला विजेतेपद मिळविण्याची संधी आहे.