ऑलिम्पिक पदकविजेती ‘भारताची फुलराणी’ सायना नेहवालने आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. कारकीर्दीत महत्त्वपूर्ण क्षणी अडथळा निर्माण करणाऱ्या चीनच्या सिझियान वांगला नमवत सायनाने उपांत्य फेरी गाठली. प्रदीर्घ रॅलींच्या आणि जवळपास तासभर झालेल्या थरारक सामन्यात सायनाने सिझियानवर २१-१६, २१-१९ असा विजय मिळवला.

पहिल्या गेममध्ये सायनाने ११-१० अशी निसटती आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर सायनाने सलग चार गुणांची कमाई करत १५-१० अशी आगेकूच केली. वांगने १६-१७ अशी  पिछाडी भरून काढत टक्कर दिली. सलग चार गुणांची कमाई करत सायनाने पहिला गेम नावावर केला.

दुसऱ्या गेममध्येही वांगने ११-९ अशी आघाडी घेतली. सायनाने टक्कर देत १६-१६ अशी बरोबरी केली. ही चुरस कायम राखत १९-१९ अशी स्थिती झाली. वांगच्या स्वैर खेळाचा फायदा उठवत सायनाने उर्वरित दोन गुणांसह सामन्यावर कब्जा केला.

भारतीय महिला संघ अंतिम फेरीत

दीपिका कुमारी, लैश्राम बॉम्बयला देवी आणि लक्ष्मीराणी माझी या भारताच्या महिला रिकव्‍‌र्ह संघाने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात बलाढय़ जर्मनीच्या संघाला नमवण्याची किमया केली. जर्मनीवर ५-३ असा विजय मिळवत भारतीय महिला संघाने रिकव्‍‌र्ह प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली.

पुरुष गटात नेदरलँड्सच्या संघाने अतन्यू दास, जयंत तालुकदार आणि मंगल सिंग चांपिया यांचा समावेश असलेल्या भारतीय संघावर ५-४ अशी निसटती मात केली. प्ले ऑफच्या लढतीत भारतीय संघाचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे.