सिंधूला पराभवाचा धक्का; रत्नाचोक इन्टॅनॉनकडून सपशेल धुव्वा
दुखापतीतून सावरत दमदार पुनरागमनसाठी उत्सुक सायना नेहवालने मलेशिया सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. मात्र जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान टिकवणाऱ्या पी.व्ही. सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झालेल्या सायनाने सर्व अनुभव पणाला लावत विजय साकारला. तिने थायलंडच्या पॉर्नटिप बुरानप्राससेटुर्कवर १९-२१, २१-१४, २१-१४ अशी मात केली. या विजयासह सायनाने पॉर्नटिपविरूद्धच्या आठपैकी सात लढतीत विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीत सायनाची लढत ताइ झ्यू यिंगशी होणार आहे. यिंगविरूद्ध सायनाची कामगिरी ५-८ अशी आहे.
पहिल्या गेममध्ये पॉर्नटिपच्या तडफदार खेळासमोर सायना निष्प्रभ ठरली. सुरुवातीला सायना ३-६ अशी पिछाडीवर होती. ही पिछाडी भरून काढत तिने १४-१४ अशी बरोबरी केली. मात्र त्यानंतर पॉर्नटिपने झुंजार खेळ करत बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये सायनाने ११-७ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी वाढवत सायनाने २०-१३ अशी मजबूत स्थिती गाठली. दुसरा गेम जिंकत सायनाने बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने स्मॅशेस, ड्रॉप तसेच नेटजवळून सुरेख खेळ करत पॉर्नटिपला जराही संधी दिली नाही. सातत्याने आघाडी मिळवत सायनाने तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या इंडिया खुल्या स्पर्धेते जेतेपदाची कमाई करणाऱ्या रत्नाचोक इन्टॅनॉनने सिंधूचा २१-७, २१-८ असा धुव्वा उडवला. रत्नाचोकविरूद्धच्या पाचपैकी चार लढतीत सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रत्नाचोकच्या सर्वसमावेशक अफलातून खेळासमोर सिंधूने सपशेल शरणागती पत्करली आहे. पहिल्या गेममध्ये रत्नाचोकने १५-४ अशी भक्कम आघाडी घेतली. सिंधूच्या स्वैर खेळाचा पुरेपूर फायदा उठवत रत्नाचोकने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही रत्नाचोकच्या झंझावाताला सिंधूकडे काहीही उत्तर नव्हते. सिंधूच्या पराभवासह सायना ही स्पर्धेतले भारताचे एकमेव आशास्थान आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी अधिकाअधिक क्रमवारी गुण मिळवण्यासाठी स्पर्धा तीव्र झालेली असताना भारताचा भार सायना नेहवालवरच आहे. दिल्लीत झालेल्या इंडिया खुल्या आणि मलेशिया सुपरसीरिज स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंना प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.