नवी दिल्लीतील सिरी फोर्ट स्पोर्ट्स संकुलात १ ते ६ एप्रिलदरम्यान रंगणाऱ्या इंडियन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला आठवे मानांकन मिळाले आहे. सायनासाठी सलामीचा पेपर सोपा असणार आहे. तिला पहिल्या फेरीत ऑस्ट्रियाच्या सिमोन प्रस्च हिच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली आणि गतविजेती चीनची ली झुरेई हिला अव्वल मानांकन तर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली थायलंडची रत्चानोक इन्थॅनोन हिला चौथे मानांकन देण्यात आले आहे. सायनाची सहकारी पी. व्ही. सिंधू हिला पहिल्याच फेरीत खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. १९ वर्षीय सिंधूला चीनच्या बलाढय़ शिझियान वँगशी सामना करावा लागेल. मात्र सिंधूने शिझियानविरुद्धच्या तिन्ही लढतींवर वर्चस्व गाजवले आहे. गेल्या आठवडय़ात स्विस खुल्या स्पर्धेत सिंधूने शिझियानला हरवले होते. महिला एकेरीत तन्वी लाड, माजी राष्ट्रीय विजेती तृप्ती मुरगुंडे, पी. सी. तुलसी, सायली राणे आणि अरुंधती पानतावणे या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पुरुष एकेरीत, गतविजेता आणि जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू मलेशियाचा ली चोंग वुई हा आकर्षण ठरणार असून त्याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. पुरुषांमध्ये भारताच्या आशा पारुपल्ली कश्यप, सौरभ वर्मा, आरएमव्ही गुरुसाईदत्त, बी. साईप्रणीथ, किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर असणार आहेत.