ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालला २६ ते ३१ मे या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी महिला एकेरीमध्ये द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.
लंडन ऑलिम्पिकनंतर दुखापती आणि खराब फॉर्ममुळे सायनाच्या कामगिरीत घसरण झाली होती. मात्र अथक सराव आणि दुखापतींवर मात करत सायनाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजचे जेतेपद नावावर केले होते. हे जेतेपद कायम राखण्याचा सायनाचा मानस आहे. इंडिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदासह सायनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र विश्रांतीच्या कारणास्तव माघार घेतल्याने सायनाची क्रमवारीत दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेद्वारे अव्वल स्थान पटकावण्याची सायनाला संधी आहे. सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सायनाचा मुकाबला पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या खेळाडूशी होणार आहे.
महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू ही भारताची अन्य खेळाडू असणार आहे. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असणाऱ्या सिंधूला स्पर्धेसाठी मानांकन देण्यात आलेले नाही. दुखापतीमुळे सिंधू प्रदीर्घ काळ अनेक स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. बिगरमानांकित सिंधूची सलामीची लढत आठव्या मानांकित चीनच्या वांग यिहानशी होणार आहे.
पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या आणि मानांकनातही चौथे स्थान पटकावलेल्या किदम्बी श्रीकांतची पहिली लढत हान्स ख्रिस्तियन व्हिटीनघुसशी होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपसमोर सहाव्या मानांकित चीनच्या वांग झेनमिंगचे आव्हान असणार आहे. इंडोनेशिया स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या एच. एस. प्रणॉय आणि चीनचा तिआन होऊवेई आमनेसामने असणार आहेत.
अनुभवी ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा सामना समंथा बार्निग आणि आयरिस टेबलिंगशी होणार आहे. प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर या जोडीसमोर काई युन आणि कांग जुन जोडीचे आव्हान असणार आहे.