लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालचे ऑल इंग्लंड स्पर्धेचे जेतेपद पटकवण्याचे स्वप्न उपांत्यपूर्व फेरीतच भंगले. ही निराशाजनक स्पर्धा बाजूला सारून स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा या नव्या अभियानासाठी सायना सज्ज झाली आहे. याआधी सायनाने २०११ आणि २०१२ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सायना उत्सुक आहे. सलामीच्या लढतीत सायनाचा मुकाबला पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या खेळाडूशी होणार आहे. खराब फॉर्म आणि दुखापती यांच्या गर्तेत अडकलेल्या सायनाने या वर्षी सय्यद मोदी स्पर्धेचे जेतेपद पटकावत जेतपदांचा दुष्काळ संपवला. पुरेशा विश्रांतीनंतर ती ऑल इंग्लंड स्पर्धेत जेतेपदाच्या इराद्याने सहभागी झाली, मात्र उपांत्यपूर्व फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला. सहाव्या मानांकित सायनाला गेल्या वर्षी या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंतच मजल मारता आली होती. दोन फेऱ्यांचा अडथळा पार केल्यास सायनासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित यिहान वांगचे आव्हान असणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये झालेल्या या दोघींमधील शेवटच्या लढतीत यिहानने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सायनाने कांस्यपदकाची कमाई केली होती. सायनाविरुद्ध यिहानची कामगिरी ६-१ अशी असून, ही कामगिरी आणखी चांगली करण्याचा यिहानचा प्रयत्न असणार आहे.
पहिल्यावहिल्या ऑल इंग्लंड स्पर्धेत सलामीच्या लढतीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागलेली पी.व्ही.सिंधू नव्याने सुरुवात करण्यासाठी आतुर आहे. सिंधूची पहिली लढत स्पेनच्या बिट्रिझ कोरालेसशी होणार आहे, मात्र तिने माघार घेतल्याने सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास सोपा होण्याची शक्यता आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकविजेत्या सिंधूला सातवे मानांकन देण्यात आले असून, उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत ऑल इंग्लंड विजेती सिझियान वांगशी होणार आहे.
पुरुष गटात तृतीय मानांकित पारुपल्ली कश्यपची सलामीची लढत नेदरलँड्सच्या इरिक मेजिसशी होणार आहे. ही लढत जिंकल्यास कश्यपचा सामना चायनीज तैपेईच्या तिआन चेन चूशी होणार आहे. थायलंड ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकवणाऱ्या किदम्बी श्रीकांतला पाचवे मानांकन देण्यात आले असून, त्याची सलामीची लढत हेन्री हुरस्केइनशी होणार आहे. मुंबईकर आनंद पवार मलेशियाच्या कोक पाँग लोकशी दोन हात करणार आहे. दुहेरी प्रकारात ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा आपले नशीब अजमवणार आहेत. अश्विनी तरुण कोनाच्या साथीने मिश्र दुहेरीत तर तरुण जिष्णू सन्यालच्या साथीने पुरुष दुहेरीत खेळणार आहे.