वर्ष : २०१२, स्थळ : लंडनचे वेम्बले स्टेडियम.. ऑलिम्पिकचा पदक प्रदान सोहळा.. संयोजक ‘सायना नेहवाल’ हे शब्द उच्चारतो.. आणि त्या स्टेडियममध्ये जमलेल्या भारतीय पाठीराख्यांचा एकच जल्लोष कानी पडतो.. दूरवर भारतातल्या बहुतांशी घरांमध्ये या जल्लोषाचा प्रतिध्वनी दुमदुमतो.. लहानपणापासून बॅडमिंटनला वाहून घेतलेल्या भारताच्या या कन्येने २२व्या वर्षीच ऑलिम्पिक पदक नावावर केल्याची अपूर्वाई क्रिकेट सोडून कोणताही खेळ न बघणाऱ्यांनाही कळते.. पदकाने तिचे आयुष्यच बदलते.. सत्कार, समारंभ, कौतुकसोहळे यांनी तिचे जग व्यापते.. पैसा-प्रसिद्धी, प्रतिष्ठा, जाहिराती यांचे आक्रमण तिच्या आयुष्यात होते.. हा चमत्कार तिचाच. अपार मेहनत, जिद्द यांच्या बळावर खडतर मार्ग जोपासल्याचे हे फळ.
वर्ष : २०१४, स्थळ : सिंगापूर सिटी.. सिंगापूर सुपर सीरिज स्पर्धेची प्राथमिक फेरी.. जपानच्या इरिको हिरोसे या बिगरमानांकित खेळाडूकडून तिचा पराभव.. सातवे मानांकन असूनही सलामीच्या लढतीनंतरच माघारी परतण्याची नामुष्की.. अन्य मानांकित खेळाडू दमदार सलामीसह आगेकूच करत असतानाच हिच्यावर मात्र पुढचे सगळे सामने प्रेक्षक म्हणून पाहण्याची वेळ आली.
या दोन प्रसंगांमधील अंतर दोन वर्षांचेही नाही. मात्र २०१२मधल्या सुखावणाऱ्या चित्राला दृष्ट लागावी अशा पद्धतीने नियतीचा फेरा उलटलेला. यशाच्या गुणगानाऐवजी आता तिच्या पराभवाची मीमांसा होते. जागतिक क्रमवारीत अव्वल तीनमधून तिची घसरण होऊन ती आता आठव्या स्थानी आहे. गुडघा, पायाचे बोट, सर्दी-ताप, पोट अशा दुखापतींचा ससेमिरा मागे लागलेला. सुपर सीरिज स्पर्धामध्ये ‘जेतेपदाची प्रबळ दावेदार’ याऐवजी अनपेक्षित पराभवाची नामुष्की झेलणाऱ्यांच्या यादीत आता तिचे नाव असते.
सायनाच्या या अधोगतीचे प्रमुख कारण म्हणजे सातत्याने उद्भवणाऱ्या दुखापती. दुखापती या आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंच्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहेत. शरीराची साथ नसेल तर क्रीडापटूंच्या वाटचालींवर मर्यादा येतात. विविध आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळताना सायनाच्या गुडघ्यांना कॅपिंग बसवलेले दिसते. हालचालींची लवचिकता निश्चित करण्यात महत्त्वाचे गुडघेच जर शंभर टक्के साथ देणारे नसतील तर विजय मिळवणे यापेक्षाही प्रतिस्पध्र्याला टक्कर देणेही कठीण आहे. गेल्या वर्षी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या आठवडाभर आधी घरातल्या दरवाजावर तिचा पाय आपटला. या दुखण्यासह ती दिल्लीला रवाना झाली. मात्र किरकोळ वाटणाऱ्या या दुखापतीने गंभीर रूप धारण केले आणि पुढच्या स्पर्धामध्येही तिला याचा फटका बसला. गेल्याच वर्षी जागतिक सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत तिला थंडीतापाने सतावले होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या वेळी पोटाने ऐन वेळी दगा दिला. दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते. मात्र महत्त्वपूर्ण स्पर्धात गैरहजेरीमुळे क्रमवारीचे गुण आणि स्थान गमवावे लागते. ही पिछाडी भरून काढण्याचे कठीण काम प्रत्येक वेळी समोर उभे ठाकते.
सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे सायनाने बॅडमिंटनला मुख्य प्रवाहात आणले. याचा परिणाम म्हणजे ‘सायनाकेंद्रित’ अर्थकारण उभे राहिले. गेल्या वर्षी झालेल्या इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये हैदराबाद हॉटशॉट्ससाठी खेळताना सायनाने सातही लढती जिंकत संघाला जेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेचा डोलारा ‘सायना’ या ब्रँडभोवती केंद्रित होता. सायना स्पर्धेत खेळू शकली नसती तर लीगच्या यशस्वितेवर थेट परिणाम झाला असता. सायना खेळली. मात्र स्पर्धेच्या दगदगीच्या वेळापत्रकामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि तिला पुढच्या दोन सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धातून माघार घ्यावी लागली. ‘सायना’ नावाच्या चलनी नाण्याला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ देणे अत्यावश्यक आहे. व्यावहारिक समीकरणांसाठी घाईने होणारे पुनरागमन थांबायला हवे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सायनाचे अस्तित्व असणे हा मुद्दाही निर्णायक आहे. महिलांमध्ये सिंधूचा अपवाद सोडला तर अव्वल २० खेळाडूंमध्ये भारताची खेळाडू नाही. पुरुष गटात अनेक खेळाडू अव्वल ५०मध्ये आहेत, परंतु एकाच्याही नावावर सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद अद्यापही नाही. दुहेरीच्या कोणत्याही प्रकारात अव्वल २५मध्ये भारताची जोडी नाही. यावरून खंडप्राय भारताच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी अजूनही तिच्याच खांद्यावर आहे. प्रत्येक वेळी यश, जेतेपद हेच परिमाण नाही. मात्र ऑलिम्पिकपूर्वी सातत्याने स्पर्धा जिंकणाऱ्या सायनाचा आलेख धवल यशानंतर ढासळताना दिसतो आहे. अननुभवी खेळाडूंकडून होणारे पराभव हे तिचे कच्चे दुवे प्रतिस्पध्र्याना खुले झाल्याचे लक्षण आहे. चीनच्या बरोबरीने थायलंड, जपान, इंडोनेशियाच्या खेळाडूंनी उंचावलेला खेळही हे यामागचे कारण आहे.
गाण्याप्रमाणे बॅडमिंटनमध्येही दमसास महत्त्वाचा असतो. तुफानी खेळ करणाऱ्या प्रतिस्पर्धी खेळाडूला रोखण्यासाठी वेगवान प्रत्युत्तर देणे गरजेचे असते. मात्र हालचालींतल्या शैथिल्यामुळे शटलपर्यंत पोहोचायलाच कष्ट पडताना दिसत आहेत. यातून बाहेर पडण्याचा मार्ग सायनाला माहीत आहे. उपांत्य, उपांत्यपूर्व या टप्प्यांपेक्षा सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद तिचा आत्मविश्वास उंचावू शकते.
क्रिकेटेतर खेळांसाठी ऑलिम्पिक म्हणजे कुलदैवत असते. या सर्वोच्च स्पर्धेत पदकप्राप्ती हा कारकिर्दीतील अत्युच्च आनंदाचा क्षण असतो. सायनाच्या बाबतीत हा आनंद २२व्या वर्षीच गवसलेला. प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद यांनी गाजवलेल्या सुवर्णकाळानंतर भारतीय बॅडमिंटनमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. दुखापतीमुळे खेळाडू म्हणून कारकीर्द अपेक्षेआधीच संपलेल्या गोपीचंद यांनी प्रशिक्षणाचे शिवधनुष्य उचलले. सायनाच्या खेळातली चमक त्यांनी अल्पावधीतच हेरली. या हिऱ्याला पैलू पाडण्याचा निर्धार गोपीचंदने केला. या दोघांच्या एकत्र अविरत प्रयत्नांची परिणती म्हणजे लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने पटकावलेले कांस्यपदक. ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर भारतीय बॅडमिंटनपटूने मिळवलेले हे पहिलेवहिले पदक ठरले. यावरूनच या पदकाची दुर्मीळता अधोरेखित होते. हे पदक व यश संस्मरणीय आणि चिरंतन काळ आनंदाचा ठेवा देणारे होते. मात्र ऐतिहासिक स्वप्नपूर्तीनंतर रिक्त पोकळीही तयार होते. ऑलिम्पिक पदक ही प्रेरणाही होऊ शकते तर काहींसाठी तो पूर्णविरामाचा थांबा ठरू शकतो. दुर्दैवाने सायनाच्या बाबतीत दुसरा पर्याय लागू झालेला दिसतो आहे. ऑलिम्पिक पदक तिच्या नावावर आहे. जागतिक अजिंक्यपद आणि ऑल इंग्लंड स्पर्धेचा अपवाद वगळता बहुतांशी सुपर सीरिज स्पर्धाची जेतेपदे तिच्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत. अशा परिस्थितीत नव्याने सुरुवात करण्यासाठीची प्रेरणा हरवल्याचे चित्र आहे.

२०१३ वर्षांतील सायनाची कामगिरी
स्पर्धा        फेरी
कोरिया सुपर सीरिज    उपांत्यपूर्व
मलेशिया सुपर सीरिज     उपांत्य फेरी
ऑल इंग्लंड    उपांत्य फेरी
इंडिया सुपर सीरिज    दुसरी फेरी
इंडोनेशिया सुपर सीरिज    उपांत्य
सिंगापूर सुपर सीरिज    उपांत्यपूर्व
चीन सुपर सीरिज    माघार
जपान सुपर सीरिज    माघार
डेन्मार्क सुपर सीरिज    उपांत्यपूर्व
फ्रान्स सुपर सीरिज    दुसरी फेरी
चीन सुपर सीरिज    दुसरी फेरी
हाँगकाँग सुपर सीरिज     दुसरी फेरी
बीडब्ल्यूएफ मास्टर्स    
जागतिक अजिंक्यपद    उपांत्यपूर्व

२०१४ वर्षांतील आतापर्यंतची कामगिरी
कोरिया सुपर सीरिज-माघार
मलेशिया सुपर सीरिज- दुसरी फेरी
इंडिया ग्रां.प्रि.स्पर्धा- विजेती
ऑल इंग्लंड- उपांत्यपूर्व फेरी
स्विस खुली स्पर्धा- उपांत्यपूर्व फेरी
इंडिया सुपर सीरिज-उपांत्यपूर्व
सिंगापूर सुपर सीरिज- पहिली फेरी