भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिची जागतिक क्रमवारीत घसरण झाली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने जाहीर केलेल्या यादीत तिला टॉप १०मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सायनाला कॅरोलिना मरिनकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ती ‘टॉप १०’मधून बाहेर फेकली गेली असून तिची ११व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत उपविजेती ठरलेली सिंधू मात्र तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तिने अत्यंत चांगली कामगिरी केली असल्याने तिच्या स्थानाला धक्का लागलेला नाही. यादीत चिनी तैपईची ताय झ्यू यिंग ही अव्वल क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर जपानची अकाने यामागुची आहे.

पुरुषांच्या क्रमवारीत किदम्बी श्रीकांतला दोन क्रमांकांनी खाली घसरावे लागले आहे. तो सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानी घसरला आहे. तर एच एस प्रणॉय ११व्या क्रमांकावर कायम आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना दोन क्रमांकांचा फायदा झाला असून ते २३व्या क्रमांकावर आले आहेत. महिला दुहेरीच्या अव्वल वीसमध्ये मात्र भारताची एकही जोडी नाही. प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी ही मिश्र दुहेरीची जोडी रँकिंगमध्ये २४व्या क्रमांकावर आहे.