11 August 2020

News Flash

विजयी अभियान!

लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेती सायना नेहवालने दणदणीत विजयासह जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत शानदार सुरुवात केली. युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत आगेकूच केली.

| August 8, 2013 01:58 am

* सायना, सिंधूची शानदार सलामी
* अजय जयरामला पराभवाचा धक्का
* कश्यपची दुसऱ्या फेरीत आगेकूच

लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेती सायना नेहवालने दणदणीत विजयासह जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत शानदार सुरुवात केली. युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत आगेकूच केली. मात्र पुरुषांमध्ये सलामीच्या लढतीत शानदार विजय मिळवणाऱ्या अजय जयरामला पराभवाला सामोरे जावे लागले. प्रतिस्पर्धी खेळाडूने माघार घेतल्याने पारुपल्ली कश्यपला विजयी घोषित करण्यात आले.
सायनाला यंदा या स्पर्धेसाठी तुलनेने सोपा ‘ड्रॉ’ मिळाला आहे. सलामीच्या लढतीत तिचा मुकाबला रशियाच्या ओल्गा गोलोवान्होव्हाशी होता. तृतीय मानांकित सायनाने अवघ्या २३ मिनिटांत ओल्गाचा २१-५, २१-४ असा धुव्वा उडवीत सहज विजय मिळवला. सायनाने २००९ आणि २०११मध्ये या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. लंडन ऑलिम्पिकनंतर दुखापती आणि ढासळता फॉर्म यामुळे सायनाला लौकिकाला साजेसा खेळ करता येत नव्हता. मात्र पुरेशी विश्रांती आणि चोख अभ्यास करून कोर्टवर उतरलेल्या सायनाने पहिल्याच लढतीत आपले वर्चस्व दाखवून दिले. सुरुवातीला नेटजवळून खेळताना सायनाने काही चुका केल्या. मात्र लवकरच ती त्यातून सावरली. कोर्टवरचा सुरेख वावर, फटक्यांतील वैविध्य आणि कमीत कमी चुका करीत सायनाने विजय मिळवला. पुढील फेरीत सायनाची लढत १५व्या मानांकित थायलंडच्या पॉर्नटिप बुरानप्रार्स्टस्कुशी होणार आहे. पॉर्नटिपविरुद्ध पाचही लढतीत सायनाने विजय मिळवला आहे.
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात सिंधूने संघर्षपूर्ण विजय मिळवला. अटीतटीच्या लढतीत जपानच्या काओरी इमाबेप्पूला २१-१९, १९-२१, २१-१७ असे नमवत सिंधूने तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले. दहाव्या मानांकित सिंधूने १ तास आणि ११ मिनिटांच्या झुंजीनंतर विजय साकारला.
सायना आणि सिंधूच्या विजयामुळे भारतासाठी विजयी दिवस ठरणार, असे वाटत असताना अजय जयरामला पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत ८८व्या स्थानी असलेल्या स्पेनच्या पाब्लो अबिअनने अजयला सरळ गेम्समध्ये २१-९, २१-१७ असे नमवले. विशेष म्हणजे जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असलेल्या अजयने सलामीच्या लढतीत क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या विंग को वी वर मात करीत खळबळजनक विजयाची नोंद केली होती.
झेक प्रजासत्ताकचा प्रतिस्पर्धी पीटर कोऊकलने दुखापतीमुळे माघार घेतल्याने कश्यपला विजयी जाहीर करण्यात आले. पीटरने माघार घेतली, तेव्हा पहिल्या गेममध्ये कश्यप १४-५ असा आघाडीवर होता. १३व्या मानांकित कश्यपची पुढच्या फेरीतील मुकाबला हाँग काँगच्या ह्य़ू यूनशी होणार आहे. याआधीच्या दोन लढतीत ह्य़ू यूनने कश्यपवर मात केली आहे.
पुरुष दुहेरीतही भारताच्या पदरी निराशाच आली. तरुण कोना आणि अरुण विष्णू जोडीलाही पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या अल्वेंट युलिआंटो चंद्रा आणि मार्किस किडो जोडीने तरुण-अरुण जोडीवर २१-१५, १३-२१, २१-१७ असा विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2013 1:58 am

Web Title: saina nehwal starts with crushing win at world championships
Next Stories
1 फिक्सिंग कायद्याने गुन्हा ठरवा
2 भारतीय क्रिकेट ‘अ’ संघात झोल, जाधवचा समावेश
3 बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
Just Now!
X