अश्विनी व सिक्की जोडी पराभूत

बॅडमिंटनमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेतील पहिला दिवस भारताच्या दृष्टीने निराशाजनक ठरला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्याचबरोबर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांचेही आव्हान संपुष्टात आले.

सायनाला पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानची खेळाडू व गतविजेती चीन तैपेईच्या ताई त्झिु यिंगचे आव्हान होते. त्यामुळे यिंगचे पारडे जड मानले गेले होते. यिंगने हा सामना २१-१४, २१-१८ असा सहज जिंकला. अश्विनी व सिक्की यांचा जपानच्या मिसाकी मात्सुमो व अयाका ताकाहाशी यांनी २१-१४, २१-१३ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला.

सायना व यिंग यांच्यात यापूर्वी झालेल्या १४ लढतींपैकी केवळ पाच सामने सायनाला जिंकता आले होते. नुकत्याच झालेल्या इंडोनेशियन मास्टर्स स्पर्धेत सायनाला तिच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. या पाश्र्वभूमीवर सायनाकडून तिला किती लढत मिळते याचीच उत्सुकता होती. पहिल्या गेममध्ये सायनाला सुरुवातीला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. त्याचा फायदा घेत यगने ९-४ अशी आघाडी घेतली होती. सायनाने जिद्दीने खेळ करीत १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर १४-१४ पर्यंत बरोबरी होती. तथापि नंतर पुन्हा सायनाने चुका करीत खेळावरील नियंत्रण गमावले. यिंगने सलग सात गुण घेताना ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला.

पहिली गेम गमावल्यानंतर सायनाने जिद्द सोडली नाही. परतीच्या खणखणीत फटक्यांचा उपयोग करीत तिने दुसऱ्या गेममध्ये १२-९ अशी आघाडी मिळविली होती. यिंगने केलेल्या चुकांचाही तिला फायदा झाला. किंबहुना सायनाकडे १६-१४ अशी आघाडीही होती. त्या वेळी ही गेम घेत सायना सामन्यात बरोबरी करील अशी अपेक्षा होती. मात्र यिंगने पुन्हा परतीचे खणखणीत फटके व अचूक प्लेसिंग असा खेळ करीत १८-१७ अशी आघाडी घेतली. सायनाने एक गुण घेत १८-१८ अशी बरोबरी साधली. तथापि नंतर यिंगने केलेल्या कल्पक खेळापुढे सायनाचा बचाव निष्प्रभ ठरला. ही गेम घेत यिंगने सामना जिंकला.

पोनप्पा व सिक्की यांना जपानच्या जोडीपुढे फारसा प्रभाव दाखविता आला नाही. जपानच्या मात्सुमो व ताकाहाशी यांनी पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून नियंत्रण मिळविले होते. त्यांनी आक्रमक खेळ केला. दुसऱ्या गेममध्येही त्यांनी ११-३ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केले. भारतीय जोडीला सूर गवसला पण तोपर्यंत सामन्याचे नियंत्रण पूर्णपणे जपानच्या जोडीकडे गेले होते. मात्सुमो व ताकाहाशी यांनी ही गेम सहज घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.