दुखापतीची साडेसाती.. खराब फॉर्म.. कोर्टवरील मंदावलेल्या हालचाली.. या सर्व गोष्टींचा फटका सायना नेहवालला बसत आहे. बिगर मानांकित आणि नवोदित बॅडिमटनपटूंना नमवणे सायनाला खडतर जात आहे. गतविजेत्या सायनाला इंडोनेशिया सुपर सीरिज स्पर्धेत लिन्डावेनी फानेट्री हिचा पाडाव करताना बराच घाम गाळावा लागला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सायनाला सलामीच्या सामन्यात विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. अखेर एक तास आणि १४ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाने इंडोनेशियाच्या लिन्डावेनी हिचा १७-२१, २९-२७, १३-२१ असा पराभव केला.
हैदराबादच्या २३ वर्षीय सायनाला आता दुसऱ्या फेरीत थायलंडच्या पोर्नटिप बुरानप्रासेत्र्सुक हिचा सामना करावा लागेल. द्वितीय मानांकित सायनाने स्मॅशेसवर अधिक भर दिला, तर फानेट्रीने नेटवर सुरेख खेळाचे प्रदर्शन घडवले. पहिल्या गेममध्ये फानेट्रीने ५-२ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सायनाने सुरेख खेळ करीत ९-९ अशी बरोबरी साधली. पण फानेट्रीने सायनापेक्षा सरस कामगिरी करीत पहिल्या गेमवर नाव कोरले. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे फानेट्रीची कामगिरी उंचावत गेली. दुसऱ्या गेममध्येही तिने ११-९ अशी आघाडी घेतली होती. सायनाने १५-१५ अशी बरोबरी साधल्यानंतर फानेट्रीला सामना जिंकण्यासाठी अवघ्या दोन गुणांची गरज होती, पण सायनाने कडवी झुंज देत दुसरा गेम २९-२७ असा जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने फानेट्रीला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. सायनाला तंदुरुस्तीचा त्रास जाणवत होता, तरी तिने ५-० अशी भक्कम आघाडी घेत तिसऱ्या गेमची सुरुवात केली. त्यानंतर सायनाने फानेट्रीला सामन्यात पुनरागमन करू दिले नाही. तिसरा गेम सहज जिंकून सायनाने आगेकूच केली. मिश्र दुहेरीत, तरुण कोना आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने प्रवीण जॉर्डन आणि विटा मारिस्सा यांचा २१-१८, १४-२१, २५-२३ असा पराभव केला. त्यांना पुढील फेरीत पोलंडच्या रॉबर्ट माटेसियाक आणि नादिएदा झिएबा यांचा सामना करावा लागेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 12:42 pm