आगामी थॉमस उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पी.व्ही.सिंधूने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सिंधू व्यतिरीक्त पुरुष दुहेरीत भारताचं प्रतिनिधीत्व करणारे सात्विकसाईराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. याऐवजी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने तरुण खेळाडूंना यंदा संघात स्थान दिलं आहे. ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान डेन्मार्कमधील आरहस शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

सायना व्यतिरीक्त साई प्रणीत आणि किदम्बी श्रीकांत या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच सायनाचा पती परुपल्ली कश्यप आणि युवा खेळाडू लक्ष्य सेनही यंदा भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करतील. सात्विक आणि चिरागच्या अनुपस्थितीत यंदा दुहेरीत भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी मनु अत्री आणि सुमीत रेड्डी या जोडीवर सोपवण्यात आली आहे. तसेच एम.आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला ही नवीन जोडीही यंदा भारताचं प्रतिनिधीत्व करेल. भारतीय खेळाडूंसोबत ७ प्रशिक्षक, ४ सपोर्ट स्टाफ आणि ३ राखीव खेळाडू प्रवास करतील.