भारतीय बॅडमिंटनपटूंनी रविवारी चिनी भूमीवर इतिहास घडवला. अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या खेळातून ‘सायना वॉल’ हे बिरुद सार्थ ठरवले. तिच्या पावलांवर पाऊल टाकत मग किदम्बी श्रीकांतने ‘चीनची भिंत’ मानल्या जाणाऱ्या लिन डॅनचे आव्हान मोडीत काढले. सायना आणि श्रीकांत यांनी सात लाख अमेरिकन डॉलर्स पारितोषिक रकमेच्या चायना खुल्या सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पध्रेचे अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीचे जेतेपद प्राप्त करीत समस्त भारतीयांना सुखद भेट दिली.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने आपला अनुभव पणाला लावत जपानच्या अकेन यामागुचीला पराभूत केले, तर युवा श्रीकांतने दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या लिन डॅनला नमवून प्रथमच सुपर सीरिज जेतेपदाचा टिळा माथी लावला.
हॅक्सिया ऑलिम्पिक क्रीडा केंद्राच्या कोर्टावर झालेल्या लढतीत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर सायनाने १७ वर्षीय अकेनचा ४२ मिनिटांत २१-१२, २२-२० असा पराभव केला.
२१ वर्षीय श्रीकांतने पाच वेळा विश्वविजेत्या डॅनला तोलामोलाची लढत देऊन वर्चस्व गाजवू दिले नाही. त्याने ४६ मिनिटांत डॅनला २१-१९, २१-१७ असे पराभूत करीत जेतेपदावर नाव कोरले. सुपर सीरिज आणि प्रीमियर दर्जाच्या स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रथमच भारतीय पुरुष खेळाडूने हे विजेतेपद प्राप्त करण्याची किमया साधली आहे.
पुरुषांच्या रोमहर्षक अंतिम लढतीत श्रीकांत प्रारंभी ११-७ असा आघाडीवर होता; परंतु डॅनने जोरदार मुसंडी मारत ११-१० पर्यंत मजल मारली. ३१ वर्षीय डॅनने आपल्या स्ट्रोक्सवर अप्रतिम नियंत्रण ठेवले होते. श्रीकांतने मग १४-१२ अशी मजल मारली. पुन्हा १९-१७ अशी डॅनने टक्कर दिली. अखेर श्रीकांतने पहिला गेम जिंकला.
दुसरा गेमसुद्धा रंगतदार ठरला. ८-८ अशा स्थितीनंतर डॅनने ११-९ अशी नाममात्र आघाडी घेतली. पुन्हा १२-१२ आणि मग १५-१५ अशी बरोबरीची रंगत टिकून होती; परंतु अखेरच्या टप्प्यात श्रीकांतने गुण मिळवण्याचा सपाटा लावत दुसरा गेम जिंकला.
गतवर्षी श्रीकांतने थायलंड ग्रां.प्रि. गोल्ड स्पर्धा जिंकली होती, तर लखनौला झालेल्या इंडिया ग्रां.प्रि. गोल्ड स्पध्रेत यंदा उपविजेतेपद पटकावले होते, तर मलेशियन खुल्या स्पर्धेत तो उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय मिश्र संघात आंध्र प्रदेशच्या श्रीकांतचा समावेश होता. k05चायना खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत सहाव्या प्रयत्नात सायनाला पहिले जेतेपद मिळवता आले. महिलांच्या अंतिम लढतीमधील पहिल्या गेममध्ये सायना ३-१ अशी आघाडीवर होती. मग तिने ही आघाडी ८-४पर्यंत वाढवली. मग चुकीच्या फटक्यांमुळे तिने काही गुण गमावले; परंतु योग्य कोनातील स्ट्रोक आणि दिमाखदार स्मॅशच्या बळावर सायनाने पहिला गेम जिंकला. वेगवान खेळ आणि शटलवरील नियंत्रण या बळावर सायनाने आपल्या युवा प्रतिस्पध्र्याला चुका करायला भाग पाडले.
अकेनने दुसऱ्या गेममध्ये अधिक चांगली लढत दिली. अप्रतिम पदलालित्याच्या बळावर तिने ११-९ अशी आघाडी घेतली. मात्र १४-१४ अशा बरोबरीनंतर दोन्ही खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत ही रंगत आणखी वाढवली आणि १८-१८ अशा बरोबरीत सामना नेला. मग सायनाकडे २०-१९ अशी आघाडी होती; परंतु अखेरच्या सत्रात जपानी अकेनला सामन्यावरील नियंत्रण राखता आले नाही आणि सायनाने वर्षांतील तिसऱ्या जेतेपदावर नाव कोरले. जूनमध्ये सायनाने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज स्पर्धा जिंकली, तर वर्षांच्या आरंभी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पध्रेचे जेतेपद प्राप्त केले होते.

चालू हंगामातील तिसऱ्या जेतेपदाला गवसणी घातल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे. या स्पध्रेतील आव्हान खडतर होते. गेले काही महिने मी यशासाठी अथक मेहनत घेत आहे आणि त्याचे फळ मला मिळाल्यामुळे मी समाधानी आहे. हा प्रवास माझ्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. चायना खुल्या स्पध्रेचे विजेतेपद माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. विमल कुमार यांच्या मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळवता आले.
-सायना नेहवाल

*सायना नेहवाल विजयी वि. अकेन यामागुची
२१-१२, २२-२०