न्यूझीलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा

नुकत्याच झालेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा सामना करावा लागलेल्या सायना नेहवालला आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाचे वेध लागले आहेत.

या वर्षी एकमेव विजेतेपद मिळवणारी भारतीय बॅडमिंटनपटू असलेल्या सायनाने इंडोनेशिया मास्टर्स विजेतेपदावर नाव कोरले होते. आता आपल्या खात्यात दुसऱ्या जेतेपदाची भर घालण्यासाठी सायना उत्सुक आहे. दुसरे मानांकन मिळालेल्या सायनाचा सलामीचा सामना चीनच्या वँग झियी हिच्याशी होणार आहे.

दरम्यान, आशियाई स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होणारी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू काही कारणास्तव या स्पर्धेत उतरणार नाही.

पुरुष एकेरीत, बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय यांच्यासह शुभंकर डे याने मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. अजय जयराम, पारुपल्ली कश्यप आणि लक्ष्य सेन यांना पात्रता फेरीत झगडावे लागणार आहे. साईप्रणीतला शुभंकरविरुद्ध लढत देऊन या स्पर्धेतील आपल्या अभियानाचा शुभारंभ करावा लागणार आहे. प्रणॉयचा सामना सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे.

पुरुष दुहेरीत, मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांच्यावर भारताची मदार असणार आहे.