यंदाच्या वर्षांत पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सायना नेहवालने प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी दिली. चुरशीच्या सामन्यात थायलंडच्या सॅपसिरी तेअरट्टनचायला २१-८, १८-२१-१६ असे नमवत सायनाने दुसरी फेरी गाठली. स्पर्धेचा ड्रॉ खडतर मिळाल्याने सायनासाठी प्रत्येक सामना आव्हानात्मक असणार होता. त्याचा प्रत्यय पहिल्या फेरीच्या सामन्यातही आला. पहिल्या गेममध्ये स्मॅशच्या फटक्याचा प्रभावीपणे वापर करत सायनाने पहिला गेम सहजतेने जिंकला. मात्र सॅपसिरीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार मुसंडी मारली. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला ६-६ अशी बरोबरी होती. मात्र सामन्यातील आव्हान जिवंत राखण्यासाठी हा गेम जिंकणे अनिवार्य असलेल्या सॅपसिरीने कमीत कमी चुका केल्या. नेटजवळून सुरेख खेळ करत तिने सायनाला पिछाडीवर टाकले. १८-१८ अशी बरोबरी असताना सलग दोन गुण घेत सॅपसिरीने आगेकूच केली. तिसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला पाहायला मिळाला. ८-८ अशा बरोबरीनंतर पुन्हा १४-१४ अशी बरोबरी झाली. सायनाने सलग दोन गुण मिळवत आगेकूच केली. मात्र सॅपसिरीने पुन्हा आपला खेळ उंचावत दोन गुण कमावले. मात्र यानंतर सायनाने चार गुण मिळवत सरशी साधली. यानंतरही सॅपसिरीने एक गुण कमावला परंतु सायनाने एक गुण मिळवत तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
यंदाच्या वर्षी झालेल्या कोरिया खुल्या स्पर्धेत सायनाला उपउपांत्यपूर्व फेरीत तर मलेशिया सुपरसीरिज स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागते. त्या पाश्र्वभूमीवर ही स्पर्धा सायनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दरम्यान अन्य लढतींमध्ये अक्षय देवलकर-प्रज्ञा गद्रे तसेच अश्विनी पोनप्पा- तरुण कोना जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.