बीडब्ल्यूएफ सुपर सीरिज फायनल्स या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पध्रेत जपानी प्रतिस्पध्र्याविरुद्ध सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांतची निराशाजनक सुरुवात झाली.

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे झगडणाऱ्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील सायनाने ३५ मिनिटांत सामना गमावला. महिला एकेरीत जपानच्या नाझोमी ओकुहाराने २१-१४, २१-६ अशा फरकाने तिला पराभूत केले. गुरुवारी ‘अ’ गटात सायनाची जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदक विजेत्या आणि अव्वल स्थानावरील कॅरोलिन मारिनशी लढत होणार आहे.
या सामन्याआधी सायनाची ओकुहाराविरुद्ध ४-० अशी दमदार कामगिरी होती. यापैकी दोन विजय या वर्षी आशियाई अजिंक्यपद आणि चीन खुल्या स्पध्रेत मिळवले होते. मात्र दुखापतीमुळे हालचालींवर मर्यादा आलेल्या सायनाला आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यात अपयश आले.
गेल्या आठवडय़ात इंडोनेशियन ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेची अंतिम फेरी गाठणाऱ्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटेने हरवले. मोमोटाने २१-१३, २१-१३ अशा रीतीने ‘ब’ गटातील ही लढत जिंकली. २२ वर्षीय श्रीकांतची गुरुवारी डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेनशी गाठ पडणार आहे. मोमोटेने नियंत्रित, परंतु आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत श्रीकांतवर दडपण आणले.