वुहान (चीन) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशानंतर भारताच्या सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत या अव्वल खेळाडूंनी आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दमदार सुरुवात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सायना आणि सिंधूने सरळ गेममध्ये विजय मिळवला, तर श्रीकांतला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला.

गोल्ड कोस्ट येथे विक्रमी सुवर्णपदक जिंकणाऱ्या सायनाने सातत्यपूर्ण खेळ करताना सिंगापूरच्या येओ जिया मिनचा २१-१२, २१-९ असा, तर रौप्यपदक विजेत्या सिंधूने चायनीज तैपेईच्या पाई यू पोचा २१-१४, २१-१९ असा पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. माजी अव्वल खेळाडू सायनासमोर पुढच्या फेरीत चीनच्या गॅओ फँगजीएचे, तर ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सिंधूसमोर चीनच्याच चेन झिओझिनचे आव्हान असणार आहे.

अव्वल मानांकित आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीकांतला जपानच्या केंटा निशिमोटोने तिने गेमपर्यंत झुंजवले. श्रीकांतने १३-२१, २१-१६,

२१-१६ अशा फरकाने बाजी मारली. पुढील फेरीत त्याला हाँगकाँगच्या वोंग विंग की विन्सेंटचा सामना करावा लागेल. समीर वर्माला पराभव पत्करावा लागला. सातव्या मानांकित चोवू टिएन चेन या तैपेईच्या खेळाडूने समीरचा २३-२१, २१-१७ असा पराभव केला.

पुरुष दुहेरीत अर्जुन एमआर व रामचंद्रन श्लोक आणि महिला दुहेरीत मेघना जक्कमपूडी व पूर्विषा एस राम या भारतीय खेळाडूंनी आगेकूच केली. अर्जुन व रामचंद्रन यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या चूंग इयूई सेओक आणि किम डुकयाँग या कोरियाच्या जोडीचा २५-२३,

२३-२१ असा पराभव केला. मेघना व पूर्विषाने सिंगापूरच्या आँग रेन-ने व वाँग जिया यिंग क्रिस्टल यांच्यावर १४-२१, २२-२०, २१-१७ असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा व अनुष्का पारिख यांना कोरियाच्या किम वोन हो व शिन सेयूंग चॅन या जोडीकडून १४-२१,

१४-२१ असा पराभव पत्करावा लागला. वेंकट गौरव प्रसाद व जुही देवगन यांचेही आव्हान संपुष्टात आले. हाँगकाँगच्या ली चून हेई रेगिनाल्ड व चाऊ होई वाह यांनी २१-११, २१-१३ अशा फरकाने भारतीय जोडीवर मात केली.