सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा
सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू व किदम्बी श्रीकांत यांनी सय्यदद मोदी स्मृतिचषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाने पाचवी मानांकित बेलाट्रिक्स मनुपुट्टी या इंडोनेशियाच्या खेळाडूवर २१-१५, २१-१५ अशी सरळ दोन गेम्समध्ये मात केली. सायनाला आता सहाव्या मानांकित झुआन देंग या चीनच्या खेळाडूच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.  जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सिंधूने इंडोनेशियाच्या हिरा डेझीवर २१-११, २१-१३ असा सहज विजय मिळविला. तिला लिंडवे फानेत्री हिच्याशी खेळावे लागणार आहे. फानेत्रीने अरुंधती पानतावणेची घोडदौड २१-१०, २१-७ अशी लीलया रोखली.
पुरुष गटात श्रीकांतला विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. त्याने ११व्या मानांकित बी. साईप्रणितला २१-१८, २०-२२, २१-१२ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले. श्रीकांतला पी. एस. प्रणयशी खेळावे लागणार आहे. प्रणयने मलेशियाच्या झुल्फादी झुल्कीफी याची अनपेक्षित विजयाची मालिका २१-१९, २१-१४ अशी खंडित केली. आदित्य प्रकाश याने इस्कंदर झुल्करनैन झैनुद्दीन याला २१-१९, १८-२१, २१-१६ असे हरविले व उपांत्य फेरी गाठली.