किदम्बी श्रीकांत व सायना नेहवाल हे गतविजेते खेळाडू इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिलांमध्ये विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक झाले आहेत. या स्पर्धेतील पात्रता फेरीच्या सामन्यांना मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना हिला ऑल इंग्लंड स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीत तर स्विस ओपन स्पर्धेतील उपान्त्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच गतवर्षी पायाचा घोटा दुखावल्यामुळे काही स्पर्धामध्ये भाग घेता आला नव्हता. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी सर्वोत्तम यश मिळविण्याचे तिचे ध्येय आहे. तिला येथील स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूशी खेळावे लागणार आहे.
सिरी फोर्ट क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेत श्रीकांत याच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने यंदाच्या वर्षांची सुरुवात सईद मोदी चषक ग्रां.प्रि स्पर्धा जिंकून केली होती. त्याला ऑल इंग्लंड स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत तर जर्मन ओपन स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत पराभवास सामोरे जावे लागले होते. त्याने मलेशियन मास्टर्स स्पर्धेतील उपान्त्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. त्याला येथे पहिल्या फेरीत चीनच्या तियान होउवेई याच्याशी खेळावे लागणार आहे. श्रीकांत म्हणाला, गतविजेता खेळाडू म्हणून खेळताना थोडेसे दडपण असते. अर्थात, ही स्पर्धा भारतात असल्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा मला मिळेल अशी मला खात्री आहे.