सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांनी आपापल्या लढती जिंकत दुबई येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायनाने दक्षिण कोरियाच्या स्युंग जि ह्य़ुनवर २१-१२, २१-१८ असा विजय मिळवला. स्युंगविरुद्ध सायनाचा हा पाचवा विजय आहे. पहिल्या गेममध्ये सायनाने १३-४ अशी आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत सायनाने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये १७-१६ अशा स्थितीतून विजयश्री खेचून आणली.
श्रीकांतने इंडोनेशियाच्या टॉमी सुर्गितोवर २१-१८, २१-१३ असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवत खळबळजनक विजय नोंदवला. याआधी या दोघांमध्ये झालेल्या एकमेव मुकाबल्यात अनुभवी सुर्गितोने सरशी साधली होती. मात्र आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधील मातब्बर खेळाडूंमध्ये रंगणाऱ्या स्पर्धेत श्रीकांतने आपले नैपुण्य सिद्ध केले.
पहिल्या गेममध्ये ४-४ असा मुकाबला बरोबरीत होता. मात्र त्यानंतर श्रीकांतने आपल्या उंचीचा फायदा उठवत तडाखेबंद स्मॅशेसच्या बळावर ११-१० अशी आघाडी मिळवली. सुर्गितोने चिवट खेळ करत परतण्याचा प्रयत्न केला. श्रीकांतने नेटजवळून टिच्चून खेळ करताना सातत्याने आघाडी वाढवत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सुर्गितोच्या झंझावातासमोर श्रीकांतचा खेळ मंदावला. श्रीकांतने ५-५ अशी बरोबरी केली. मात्र यानंतर श्रीकांतने आक्रमक पवित्रा स्वीकारला. श्रीकांतच्या सर्वागीण खेळासमोर सुर्गितो निष्प्रभ ठरला. सलग सहा गुणांची कमाई करत श्रीकांत मजबूत स्थितीत पोहोचला. ही आघाडी वाढवत श्रीकांतने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.