जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्यानंतर सुसाट वेगाने आगेकूच करणाऱ्या सायना नेहवालने मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत सायनाने १ तास ११ मिनिटे चाललेल्या या सामन्यात चीनच्या सुन यूचा २१-११, १८-२१, २१-१७ असा पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सायनाचे पारडे जड होते. सुरुवातीपासून सायनाने खेळ उंचावला. तिने पहिल्याच गेममध्ये १२-४ अशी आघाडी घेतली होती. तिने सलग आठ गुणांची कमाई करीत पहिला गेम नावावर केला. मात्र जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या सुन हिने दमदार पुनरागमन करून दुसऱ्या गेममध्ये ७-१ अशी आघाडी मिळवली, परंतु सायनानेही अप्रतिम खेळ करून हा गेम १४-१४ असा बरोबरीत आणला. मात्र सुनने संथ पण अचूक खेळ करून हा गेम आपल्या नावावर करीत स्पध्रेतील चुरस वाढवली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाच्या ११-४ अशा आघाडीनंतरही सुनने जबरदस्त खेळ करून सामना १७-१७ असा बरोबरीत आणला. मात्र सायनाने सलग चार गुण
मिळवून या गेमसह सामनाही खिशात
टाकला.
 उपांत्य फेरीत सायनाला ऑलिम्पियन विजेत्या ली झुएरुईशी सामना करावा लागेल. गतवर्षी दुखापतीमुळे झुएरुईने मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेतून माघार घेतली होती, तसेच गेल्या आठवडय़ात झालेल्या भारतीय खुल्या स्पध्रेतही ती खेळली नव्हती. दोन वेळा विश्व अजिंक्यपद स्पध्रेत रौप्यपदक पटकावणाऱ्या चिनी खेळाडूने सायनावर आठ विजय साजरे केले आहेत. सायनाला २०१० मध्ये सिंगापूर खुली स्पर्धा आणि २०१२ मध्ये इंडोनेशियन खुली स्पध्रेत झुएरुईवर विजय मिळवण्यात यश आले आहे.