मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत आव्हान संपुष्टात आलेली सायना नेहवाल लखनौ येथे सुरू होत असलेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे. पुरुषांमध्ये अव्वल मानांकित पारुपल्ली कश्यप जेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. खराब फॉर्म आणि दुखापती यांच्या फेऱ्यात अडकलेल्या सायनाला २०१३ मध्ये एकाही जेतेपदावर नाव कोरता आले नव्हते. यंदाच्या वर्षांतील कोरिया सुपर सीरिज स्पर्धेतून तिने माघार घेतली होती. त्यामुळे घरच्या मैदानावर तरी सायना जेतेपदाला गवसणी घालते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झालेली सायनाचा सलामीचा मुकाबला स्वीडनच्या मटिल्डा पीटरसनशी होणार आहे. द्वितीय मानांकित पी.व्ही.सिंधू आणि सायना यांच्यात जेतेपदासाठी चुरस रंगण्याची शक्यता आहे. सिंधूची पहिली लढत मलेशियाच्या लि लिआन यांगशी होणार आहे. महिलांमध्ये सायली गोखले, अरुंधती पनतावणे, तृप्ती मुरगुंडे, पी.सी. तुलसी या मानांकित खेळाडू आहेत.