ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी खडतर आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ही स्पर्धा मंगळवारपासून बर्मिगहॅम येथे सुरू होत आहे.
सायना २००७पासून या स्पर्धेत भाग घेत असून २०१०मध्ये तिने उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. ही तिची आजपर्यंतची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. गेले दोन वर्षे तिला येथे उपांत्यपूर्व फेरीत तिच्यापेक्षा कमी मानांकित खेळाडूंकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली आहे. यंदा तिला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. पहिल्या फेरीत तिला थायलंडच्या सेपश्री तेरातानाचाई हिच्याशी खेळावे लागणार आहे. तेपश्रीविरुद्ध आतापर्यंत चार वेळा सायनाचा सामना झाला असून प्रत्येक सामन्यात सायनाने विजय मिळविला आहे. कोरियन स्पर्धेत तेपश्री हिने सायनास तीन गेम्सपर्यंत झुंजविले होते. सायनाने पहिली फेरी जिंकली तर तिला जपानच्या मिनात्सू मितानी हिच्याबरोबर खेळावे लागणार आहे. मितानी हिने फ्रेंच स्पर्धेतील अंतिम फेरीत सायनावर आश्चर्यजनक मात केली होती. त्यानंतर सायनापुढे शिक्सियान वाँग किंवा यानजिओ जियांग यांच्यापैकी एका खेळाडूचे आव्हान असेल.
‘‘विजेतेपदासाठी मला खूप मेहनत करावी लागणार आहे. तथापि त्याची तयारी मी आधीच केली आहे. ऑलिम्पिक कांस्यपदकानंतरची ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा असल्यामुळे मी प्रत्येक सामना गांभीर्याने घेणार आहे,’’ असे सायनाने सांगितले.  
भारताच्या पी. व्ही. सिंधू हिला पहिल्या फेरीत थायलंडच्या ओंबाम्रुंफान बुसानन हिच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
पुरुष एकेरीत पी. कश्यप याला पहिल्या फेरीत चीन तैपेईच्या जेन जाओसू याच्याशी खेळावे लागणार आहे. त्यानंतर त्याच्यापुढे जपानच्या केनिची तागो याचे आव्हान असेल. अजय जयराम याला पहिल्या फेरीतच चीनच्या झेंगमिंग वाँग या बलाढय़ खेळाडूशी लढत द्यावी लागणार आहे.
मिश्र दुहेरीत ज्वाला गट्टा व व्ही. दिजू यांच्यापुढे जर्मनीच्या पीटर केस्बोर व इसाबेल हेर्टिच यांचे आव्हान असेल. अश्विनी पोनप्पा व तरुण कोना यांना पहिल्या फेरीत फ्रानो कुर्निवान व शँडी पुष्पा इरावती यांच्याविरुद्ध आपले कौशल्य दाखवावे लागणार आहे. महिला दुहेरीत ज्वाला व प्राजक्ता सावंत यांना पहिल्या फेरीत थायलंडच्या अर्तिमा सेरिथामारक व पीराया मुन्कितामोर्न यांच्याशी खेळावे लागणार आहे. अश्विनी व प्रज्ञा गद्रे या जोडीस पहिल्या फेरीत सराह थॉमस व कॅरिसा टर्नर यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.