कश्यप, साईप्रणीत यांची दुसऱ्या फेरीत आगेकूच; समीर वर्मा पराभूत

चीन खुली बॅडमिंटन स्पर्धा

जगज्जेती पी. व्ही. सिंधूप्रमाणेच भारताची फुलराणी सायना नेहवाल हिची कामगिरी ढेपाळत चालली आहे. बुधवारी चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायनाचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यप आणि बी. साईप्रणीत यांनी मात्र आपापले सामने जिंकत दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे.

जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या सायनाला चीनच्या काय यान यान हिच्याकडून अवघ्या २४ मिनिटे रंगलेल्या लढतीत ९-२१, १२-२१ असा दारुण पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत २२व्या क्रमांकावर असलेल्या काय हिने सायनाला स्थिरावण्याची कोणतीही संधी दिली नाही. पहिल्यांदाच एकमेकींशी भिडणाऱ्या सायनाला अखेपर्यंत आपला खेळ उंचावता आला नाही.

जानेवारी महिन्यात इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर सायनाला तंदुरुस्तीचा सामना करावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांत सायनाने दुखापतीच्या कारणास्तव अनेक स्पर्धामधून माघार घेतली होती. गेल्या महिन्यात फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यानंतर सायनाला लागोपाठ तीन स्पर्धामध्ये पहिल्या फेरीतच हार पत्करावी लागली आहे.

सायनाचा पती आणि वैयक्तिक प्रशिक्षक कश्यप याने थायलंडच्या सिथ्थिकोम थामासिन याच्यावर सहज विजय मिळवला. ४३ मिनिटे रंगलेला हा सामना कश्यपने २१-१४, २१-३ असा सहज जिंकला. कश्यपला आता दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या सातव्या मानांकित विक्टर अ‍ॅक्सेलसन याच्याशी लढत द्यावी लागेल.

जागतिक कांस्यपदकाला गवसणी घालणाऱ्या बी. साईप्रणीतने इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तो याला संघर्षपूर्ण लढतीत १५-२१, २१-१२, २१-१० असे हरवत दुसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या कश्यपला पुढील फेरीत डेन्मार्कच्या चौथ्या मानांकित अँडर्स अँटोनसेन याच्याशी झुंज द्यावी लागेल.

जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेल्या समीर वर्मा याचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊ याने समीरचा २१-१८, २१-१८ असा पराभव केला.

प्रणव-सिक्की, मनू-सुमित पराभूत

मिश्र दुहेरीत, प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यांना चायनीज तैपेईच्या वँग चि-लिन आणि चेंग ची या जोडीकडून १४-२१, १४-२१ अशी हार पत्करावी लागली. पुरुष दुहेरीत, मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांनाही मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वू यिक यांनी २३-२१, २१-१९ असे पराभूत केले.