स्लोवाकियात सुरु असलेल्या World Junior Wrestling स्पर्धेत भारताच्या सजन भनवालने रौप्यपदकाची कमाई केली आहे. ७७ किलो ग्रेको रोमन प्रकारात रशियाच्या इस्लाम ओपिव्हने सजनवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत मिळवलेल्या रौप्यपदकासह सजन Junior Wrestling मध्ये लागोपाठ पदक मिळवणारा पहिला भारतीय पैलवान ठरला आहे. २०१७ साली झालेल्या स्पर्धेत सजनने कांस्यपदकाची कमाई केली होती.

आज झालेल्या सामन्यात रशियाचा इस्लाम ओपिव्हने सजन भनवालवर चांगलंच वर्चस्व गाजवलं. पहिल्या ९० सेकंदांमध्ये ओपिव्हने धडाकेबाज खेळी करुन सजनला मॅटच्या बाहेर फेकलं. यानंतर संपूर्ण सामन्यात ओपिव्हने आपलं वर्चस्व राखत ८-० च्या फरकाने बाजी मारली. सजन व्यतिरीक्त ५५ किलो ग्रेको रोमन प्रकारात भारताच्या विजयनेही कांस्यपदकाची कमाई केली.