आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या दमदार कामगिरीने आपली लिंबूटिंबू संघ म्हणून असलेली ओळख मिटवून टाकलेल्या बांगलादेशच्या संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पराक्रम केला आहे. बांगलादेशच्या शाकीब अल हसन आणि कर्णधार मुशफिकूर रहीम यांनी पाचव्या विकेटसाठी न्यूझीलंडविरुद्ध ३५९ धावांची ऐतिहासिक भागीदारी रचली आहे. न्यूझीलंडविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाने पाचव्या विकेटसाठी रचलेली ही इतिहासातील सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. याशिवाय शाकिब हल असन याने सामन्यात सर्वाधिक २१७ धावांची कामगिरी केली आहे. बांगलादेशकडून करण्यात आलेली ही आजवरची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. शाकिब आणि मुशफिकूरच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर बांगालदेशला पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवसाच्या अखेरीस ७ विकेट्सच्या मोबदल्यात ५४२ धावांचा डोंगर उभारता आला आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत शाकिबने २१७ धावांची, तर मुशफिकुर याने १५९ धावांची खेळी साकारली. शाकिबने आपल्या खेळीत तब्बल ३१ चौकार ठोकले. सामन्याच्या दुसऱया दिवसाचा खेळ समाप्त होण्यास अवघ्या १५ मिनिटांचा कालावधी शिल्लक असाताना शाकिब बाद झाला.

वाचा: बांगलादेशच्या मुशफिकूरकडून भारताच्या पराभवाची खिल्ली

 

न्यूझीलंडविरुद्ध याआधी १९७३ साली पाकिस्तानच्या आसिफ इकबाल आणि मुश्ताक मोहम्मद यांनी पाचव्या विकेटसाठी ३५० धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर आज ४३ वर्षांनंतर बांगलादेशच्या जोडीने हा विक्रम मोडीत काढला. शाकिब आणि मुशफिकुरची ३५९ धावांची भागीदारी आंतरराष्ट्रीय कसोटी विश्वात आजवरची चौथी सर्वाधिक धावांची भागीदारी ठरली आहे. शाकिब अल हसन याने कसोटी विश्वातील ३ हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो बांगलादेशचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी तमीम याने २०१५ साली पाकिस्तानविरुद्ध २०६ धावांची खेळी साकारली होती.

वाचा: शेर-ए-बांगलांची विजिगीषु वृत्ती दिसलीच नाही!

तत्पूर्वी, दुसऱया दिवासाची सुरूवात झाली तेव्हा बांगलादेशची स्थिती ३ बाद १५४ अशी होती. त्यानंतर मोमिनुल हक ६४ धावांवर बाद झाला. मग पुढील ८२ षटकांमध्ये बांगलादेशची एकही विकेट न गमावता शाकिब आणि मुशफिकुर यांनी दमदार कामगिरीची नोंद केली. शाकिब अस हसन याला मिचेल सँटनर याने १८९ धावांवर जीवनदान दिले. सँटनरकडून शाकिबचा झेल सुटला होता. तर मुशफिकुर ७८ धावांवर खेळत असताना ट्रेंट बोल्टने टाकलेला चेंडू स्टम्प्सला स्पर्श करून गेला होता. पण बेल्स खाली न पडल्याने मुशफिकुरलाही जीवनदान मिळाले होते.