भारतीय संघ सध्या विंडिज दौऱ्यावर आहे. हा दौरा ४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पण माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र या दौऱ्यातून माघार घेतली आहे. तो भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत आहे. ३१ जुलैपासून त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा देण्यास सुरू केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत काश्मीर खोऱ्यातच असणार आहे. पण या दरम्यान एका खास कारणामुळे धोनीची पत्नी साक्षी हिला धोनीची खूपच आठवण येत असून तिने खास फोटो शेअर करून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

धोनी दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत आहे. पण धोनीच्या घरी मात्र एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. धोनीचे बाईक आणि कारवरील प्रेम हे साऱ्यांना माहितीच आहे. तशातच धोनीच्या घरी लाल जीप ग्रँड चेरोकी दाखल झाली आहे. त्यामुळे साक्षीला धोनीची खुपच आठवण येत आहे. तिने त्या कारचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली धोनी, मला तुझी खूप आठवण येते असेही लिहिले आहे.

धोनीकडे लष्कराची लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी आहे. ३१ जुलैपासून त्याने काश्मीरमधील नेमून दिलेल्या भागात गस्त घालण्यास सुरुवातदेखील केली आहे. त्यामुळे आता धोनी लष्कराच्या गणवेशात दिसत असून त्याचे त्या भागातील फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. तशातच लेह लडाख भागात धोनी १५ ऑगस्टला ध्वजारोहण करणार असल्याचे समजत आहे.

धोनी नक्की कुठे ध्वजारोहण करणार आहे, ते अद्याप सांगण्यात आलेले नाही. पण वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार धोनी १० ऑगस्टला लेहसाठी रवाना होणार आहे. त्यामुळे धोनी लेह विभागात ध्वजारोहण करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय नुकतेच कलम ३७० रद्द झाल्याने काश्नीर आणि आसपासच्या परिसराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. जम्मू-काश्मीर आणि लेह हे विभाग चांगलेच चर्चेत आहेत.