विनेश फोगटचेही आव्हान संपुष्टात

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक जिंकवून देणाऱ्या साक्षी मलिकला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. साक्षीबरोबरच विनेश फोगटचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

या स्पर्धेतील तीन दिवसांमध्ये भारताची पदकांची पाटी कोरीच राहिली होती. त्यामुळे गुरुवारी साक्षीच्या रूपात तरी पदक मिळेल, अशी भारताला अपेक्षा होती. पण साक्षीने अपेक्षाभंगच केला. ६० किलो वजनी गटामध्ये पहिल्याच फेरीत जर्मनीच्या लुइसा निइमेचने साक्षीला ३-१ असे पराभूत केले.

विनेशला ४८ किलो वजनी गटामध्ये अमेरिकेच्या व्हिक्टोरिया अँथनीने सहज पराभूत केले. भारताच्या शीतल तोमर (५३ किलो) आणि नवज्योत कौर (६९ किलो) यांनाही पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या महिला खेळाडूंपैकी शीतलने या वेळी चांगली लढत दिली. पहिल्या फेरीत शीतलने ऑस्ट्रिेलियाच्या जेसिका मॅकबेनवर १०-० असा दणदणीत विजय मिळवला होता. पण उपांत्यपूर्व फेरीत मात्र तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. उपांत्यपूर्व फेरीत शीतलला रोमानियाच्या इस्टेरा डॉर्बेकडून २-४ असा पराभव स्वीकारावा लागला. मंगोलियाच्या ऑचिरबट नासानबुरमाने नवज्योतवर १०-५ अशी मात केली.