बचावात्मक तंत्रात खूप सुधारणा केल्यामुळे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकला आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये सोनेरी कामगिरीची अपेक्षा आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवण्यापूर्वी झालेल्या उपांत्य लढतीत बचावात्मक तंत्रामधील कमकुवतपणा साक्षीच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता. त्यानंतर गतवर्षी झालेल्या राष्ट्रकुल अिजक्यपद स्पर्धेत मात्र तिने बचाव तंत्रात बदल केल्यामुळे सुवर्णपदकाची कमाई केली होती. तशीच सातत्यपूर्ण कामगिरी ठेवीत तिला आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सोनेरी यश मिळवायचे आहे.

‘‘बचाव तंत्रात नेमका कोणता बदल केला आहे हे गुपित मी सांगू शकणार नाही. परंतु माझा आत्मविश्वास उंचावला आहे, हे मी निश्चितपणे सांगू शकेन. त्यासाठी प्रशिक्षक कुलदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मी भरपूर सराव केला आहे. ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर माझ्या जीवनात खूप बदल झाला आहे. चाहत्यांना माझ्याकडून सतत सोनेरी कामगिरीचीच अपेक्षा निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा महत्त्वाची आहे. या स्पर्धेत कॅनडा, नायजेरिया आदी खेळाडूंचे माझ्यापुढे आव्हान आहे. त्यादृष्टीनेच मी त्या खेळाडूंच्या लढतींचा अभ्यास केला आहे. ऑलिम्पिकमधील अनुभवाचा फायदा मला तेथे मिळणार आहे. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा व २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धासाठी मी कसून सराव करणार आहे,’’ असे साक्षीने सांगितले.

‘‘प्रीमिअर लीगमधील लढतींच्या वेळी मला परदेशी खेळाडूंच्या तंत्राचे भरपूर निरीक्षण करता आले आहे. तेथील लढतींमुळे माझ्या शैलीत व चापल्यतेत वाढ झाली आहे. गतवेळी मला ग्लासगो येथे अंतिम फेरीत नायजेरियाच्या अमिनेत अदेनियीकडून दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र शेवटपर्यंत चिवट लढत देण्याची मला खात्री आहे,’’ असे साक्षी म्हणाली.