रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केलेली भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. नुकतेच जाहीर झालेल्या कुस्तीपटूंच्या जागतिक क्रमवारीच्या यादीत महिलांच्या ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिक हिला चौथे स्थान देण्यात आले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत माघार पत्कराव्या लागलेल्या विनेश फोगट हिच्याची क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती झाली आहे. विनेश फोगट हिला ४८ किलो वजनी गटात ११ वे स्थान मिळाले आहे.
वाचा: पदक मिळण्याआधीही खेळाडूंना पाठिंबा द्या!
दुसरीकडे पुरूष कुस्तीपटूंमध्ये केवळ दोनच भारतीयांना पहिल्या २० खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. संदीप तोमर याला ५७ किलो वजनी गटात १५ वे स्थान मिळाले आहे, तर ६१ किलो वजनी गटात बजरंग पुनिया याला १८ वे स्थान मिळाले आहे.
वाचा: अडथळे येतीलच; पण अथक मेहनत घ्या!
साक्षी मलिक हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरीत महिला कुस्तीगटात भारताला पहिल्या वहिल्या पदाकाची कमाई करून दिली. त्यानंतर संपूर्ण देशभरात साक्षी मलिकवर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला. साक्षी मलिकचे पदक देशात महिला कुस्तीला प्रोत्साहन देणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. आता जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवून साक्षी मलिक हिने आणखी एक ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 6:28 pm