नवी दिल्ली : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकला आगामी जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात सहज प्रवेश मिळाला. निवड चाचणीत तिची स्पर्धक सरिता मोरने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे साक्षीला ६२ किलो गटात न खेळताच भारतीय संघाचे द्वार खुले झाले.

साक्षीला यंदा अपेक्षेइतके यश मिळवता आलेले नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते, तर जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला पदक मिळवता आले नव्हते.

साक्षी व सुशील कुमार यांना भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी निवड चाचणीत सहभागी होण्याचे भारतीय कुस्ती महासंघाने आदेश दिला होता. सुशील कुमारने खराब कामगिरीमुळे या चाचणीतून माघार घेतली आहे. महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले की, ‘‘सरिताने गुडघ्याच्या दुखापतीमुळे चाचणीत सहभागी होणार नसल्याचे कळवले आहे. पुरुषांच्या ६५ किलो गटात बजरंग व महिलांच्या ५० किलो गटात विनेश फोगट यांना थेट प्रवेश दिला आहे. ५३ किलो गटासाठी रितू फोगट व पिंकी यांच्यात चाचणी घेतली जाणार आहे. टर्कीमधील स्पर्धेत रितूने ५० किलो गटात भाग घेतला होता. मात्र जागतिक स्पर्धेसाठी आपण ५३ किलो गटात जास्त चांगले यश मिळवू शकू असे तिने कळविले असल्यामुळेच आम्ही तिला चाचणीत सहभागी करून घेतले आहे.’’

रितू व पिंकी यांच्यात मंगळवारी लखनौ येथे चाचणी घेतली जाणार असून या चाचणीस महिलांचे राष्ट्रीय प्रशिक्षक कुलदीप मलिक उपस्थित राहणार आहेत. चितोरगड येथे २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान २३ वर्षांखालील गटाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आगामी ऑलिम्पिकसाठी नैपुण्यशोध घेण्याची संधी या स्पर्धेद्वारे मिळणार आहे, असे तोमर यांनी सांगितले.