* धक्कादायक विजय मिळवत व्हेनेझुएला उपांत्यपूर्व फेरीत * मेक्सिकोची दुबळ्या जमैकावर सहज मात
उरुग्वेचे कोपा अमेरिका शतकमहोत्सवी फुटबॉल स्पध्रेतून आव्हान संपुष्टात आले आहे, तर व्हेनेझुलेआ आणि मेक्सिकोने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.
कोपा अमेरिकेचे विक्रमी १५ वेळा विजेतेपद नावावर असणाऱ्या उरुग्वेचे १९९७ नंतर प्रथमच गटसाखळीत आव्हान संपुष्टात आले आहे. गुरुवारी फिलाडेल्फिया येथे झालेल्या सामन्यात व्हेनेझुएलाने उरुग्वेवर १-० असा धक्कादायक विजय मिळवला. त्यामुळे ‘क’ गटातून उरुग्वेला बाद होण्याची नामुष्की ओढवली. याशिवाय पॅसाडेना येथे मेक्सिकोने जमैकाला २-० असे नामोहरम केले.
‘‘या स्पध्रेत अपेक्षित खेळ बहरू शकला नाही आणि त्याचीच किंमत आम्हाला मोजावी लागली. २०१८च्या विश्वचषक पात्रतेचे आव्हान समोर असताना ही संघासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे,’’ असे उरुग्वेचे प्रशिक्षक ऑस्कर ताबारेझ यांनी सांगितले.
‘‘यंदाची कोपा अमेरिका स्पर्धा अतिशय वेगळी आहे. अशा प्रकारे अनुभव कधीच आला नव्हता. मात्र विश्वचषक स्पध्रेच्या पात्रतेच्या दृष्टीने आता जागे व्हायची वेळ आली आहे,’’ असे ताबारेझ यांनी सांगितले.
बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लुइस सुआरेझची दुखापत हे उरुग्वेच्या अपयशाचे प्रमुख कारण ठरले. मांडीच्या स्नायूवर उपचार घेणाऱ्या सुआरेझचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र तो एकही मिनिट मैदानावर उतरू शकला नाही. डगआऊटमध्येच तो पाहायला मिळायचा. तिथेच त्याचे नैराश्य मात्र तो लपवू शकला नव्हता. एका सामन्याच्या वेळी हुकलेली संधी पाहून सुआरेझने डगआऊटच्या भिंतीवर ठोसा मारला होता.
सुआरेझला संघात स्थान न देण्याच्या निर्णयाची ताबारेझ यांनी पाठराखण केली. ‘‘सुआरेझ खेळण्यासाठी तंदुरुस्त नव्हता. खेळण्यासाठी १०० टक्के सज्ज असलेल्या खेळाडूलाच खेळवणे मला योग्य वाटते. तो संतप्त झाला आहे का? मला याची काहीच कल्पना नाही. कारण तो माझ्याशी काहीच बोललेला नाही,’’ असे ताबारेझ यांनी सांगितले.
व्हेनेझुएलाच्या विजयावर मोहर उमटवणारा एकमेव गोल ३६व्या मिनिटाला अ‍ॅलेजँड्रो ग्युएराने उरुग्वेचा गोलरक्षक फर्नाडो मुसलेराला चकवून साकारला. ‘क’ गटातील अखेरची लढत १३ जूनला मेक्सिको आणि व्हेनेझुएला यांच्यात होणार आहे. या सामन्यातून गटातील अव्वल संघ ठरणार आहे.
सलामीच्या लढतीत उरुग्वेचा ३-१ असा पराभव करणाऱ्या मेक्सिकोला दुबळ्या जमकाचे आव्हान अजिबात जड गेले नाही. पॅसाडेना रोस बाऊल स्टेडियमवरील ८३ हजार २६३ फुटबॉलरसिकांच्या साक्षीने त्यांनी शानदार विजय मिळवला.
रिअल माद्रिदचा आक्रमकपटू जेव्हियर हर्नाडिझने १८व्या मिनिटाला संघाचे खाते उघडताना आपल्या कारकीर्दीतील ४५वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला. दुसऱ्या सत्रात जमैकाला पेनल्टी नाकारण्यात आली. त्यानंतर ८१व्या मिनिटाला बदली खेळाडू ओरिबे पेराल्टाने मेक्सिकोला दुसरा गोल नोंदवून दिला.