चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारताची २ बाद १२ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना सन्नाटा पसरला होता. मुरली विजय आणि वीरेंद्र सेहवागचे दांडके उडविणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनच समोर होता. पण सचिनने दडपण झुगारून देत त्याच्या षटकात तीन सणसणीत चौकार खेचले. मग ३९ वर्षीय सचिनने चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या साथीने भारताला दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १८२ अशी मजल मारून दिली. सचिन ७१ धावांवर खेळत असून, रविवारी क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाच्या दिवशी शतकाची अदाकारी पेश करण्यासाठी तो उत्सुक आहे. याचप्रमाणे कोहली ५० धावांवर खेळत असून, भारत अद्याप १९८ धावांनी पिछाडीवर आहे.
सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीमधील ६७वे अर्धशतक साकारताना भारतीय भूमीवर सात हजार धावांचा टप्पा ओलांडला. कोहलीने आपले कसोटी क्रिकेटमधील सातवे अर्धशतक पूर्ण केले. सचिन आणि कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली.
सकाळच्या सत्रात शुक्रवारच्या ७ बाद ३१९ धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावाला प्रारंभ केला. मायकेल क्लार्क (१३०) आणि पाहुण्यांच्या तळाच्या फलंदाजांनी आणखी ६४ धावांची भर घालत संघाला या खेळपट्टीवर आव्हानात्मक अशी ३८० धावसंख्या उभारून दिली. शुक्रवारी सहा बळी घेणाऱ्या आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम देताना नॅथन लिऑनला तंबूची वाट दाखवली. याशिवाय १०३ धावांत ७ बळी अशी आपली कसोटीतली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. जडेजा (२/७१) आणि हरभजन सिंग (१/८७) यांनी त्याला चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवात खराब झाली मुरली विजय (२) आणि सेहवाग (१०) या भारताच्या आघाडीच्या फळीला पॅटिन्सनने तंबूची वाट दाखवत भारताच्या आव्हानातील हवाच काढली. पण सचिनने चेतेश्वर पुजाराच्या (४४) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचून भारताच्या धावसंख्येला स्थर्य मिळवून दिले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : इडी कोवन यष्टिचीत धोनी गो. अश्विन २९, डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. अश्विन ५९, फिल ह्य़ुजेस त्रिफळा गो. अश्विन ६, शेन वॉटसन पायचीत गो. अश्विन २८, मायकेल क्लार्क झे. कुमार गो. जडेजा १३०, मॅथ्यू व्ॉड पायचीत गो. अश्विन १२, मोझेस हेन्रिक्स पायचीत गो. अश्विन ६८, मिचेल स्टार्क त्रिफळा गो. जडेजा ३, पीटर सिडल झे. सेहवाग गो. हरभजन १९, जेम्स पॅटिन्सन नाबाद १५, नॅथन लिऑन झे. कोहली गो. अश्विन ३, अवांतर (बाइज-१, लेगबाइज- ७) ८, एकूण १३३ षटकांत सर्व बाद ३८०
बाद क्रम : १-६४, २-७२, ३-१२६, ४-१३१, ५-१५३, ६-३०४, ७-३०७, ८-३६१, ९-३६४, १०-३८०
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १३-१-५२-०, इशांत शर्मा १७-३-५९-०, हरभजन सिंग २५-२-८७-१, आर. अश्विन ४२-१२-१०३-७, रवींद्र जडेजा ३६-१०-७१-२
भारत (पहिला डाव) : मुरली विजय त्रिफळा गो. पॅटिन्सन १०, वीरेंद्र सेहवाग त्रिफळा गो. पॅटिन्सन २, चेतेश्वर पुजारा त्रिफळा गो. पॅटिन्सन ४४, सचिन तेंडुलकर खेळत आहे ७१, विराट कोहली खेळत आहे ५०, अवांतर (लेगबाइज-३, वाइड-२) ५, एकूण ५२ षटकांत ३ बाद १८२
बाद क्रम : १-११, २-१२, ३-१०५
गोलंदाजी : मिचेल स्टार्क १४-२-३७-०, जेम्स पॅटिन्सन ६-१-२५-३, पीटर सिडल ८-१-३१-०, नॅथन लिऑन १४-०-५५-०, मोझेस हेन्रिक्स ८-२-१७-०, मायकेल क्लार्क २-०-१४-०.