भारताचा माजी यष्टिरक्षक समीर दिघेने फक्त एका हंगामानंतर मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ४१ वेळा जिंकणाऱ्या मुंबईला नवा प्रशिक्षक शोधावा लागणार आहे.

२००१-२००२ या कालखंडात दिघेने भारताचे सहा कसोटी आणि २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. २०१६-१७चा हंगाम संपल्यानंतर दिघेने प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र वर्षभराचा कार्यकाळ संपल्यानंतर तो वाढवण्यास दिघेने नकार दिला आहे.

‘‘दिघेचा प्रशिक्षकपदाचा करार हा एका वर्षांचा होता. हा करार संपला आहे. आम्ही त्याला करारात वाढ करण्याबाबत विचारणा केली. मात्र कौटुंबिक कारणास्तव त्याने नव्याने करार करू नये, अशी विनंती केली. त्यामुळे आता नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे,’’ असे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सूत्रांनी सांगितले.

भारताचे माजी प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याकडून मुंबईच्या प्रशिक्षकपदाची धुरा ४९ वर्षीय दिघेकडे चालत आली. मागील हंगामात कर्नाटककडून पराभूत झाल्यामुळे मुंबईचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. याचप्रमाणे विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत मुंबईने बाद फेरीपर्यंत मजल मारली. परंतु कोणत्याही स्पध्रेत विजेतेपद मात्र मुंबईला मिळवता आले नाही.