भारताच्या समीर वर्माने स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद नावावर केले. २०१७ मध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या समीरने स्विस स्पर्धेच्या अंतिम लढतीत डेन्मार्कच्या जॅन ओ जॉर्गन्सेनवर २१-१५, २१-१३ असा सरळ गेमवर विजय मिळवला. ३६ मिनिटांच्या या लढतीत समीरचे निर्विवाद वर्चस्व गाजवले.

पहिल्या गेममध्ये सुरुवातीला थोडासा संयमी खेळ करणाऱ्या समीरने प्रतिस्पर्धी खेळाडूला गाफील ठेवताना ११-७ अशी आघाडी घेतली. मात्र जॉर्गन्सेनने ही पिछाडी १०-१२ अशी कमी केली; परंतु समीरने सलग पाच गुणांसह पुन्हा १७-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर समीरने अगदी सहजपणे हा गेम जिंकला. पहिला गेम जिंकण्यासाठी त्याला १७ मिनिटे संघर्ष करावा लागला.

दुसऱ्या गेममध्ये पहिल्या दहा गुणांपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी स्पर्धा पाहायला मिळाली. समीरने दमदार क्रॉस कोर्ट स्मॅश लगावताना ११-६ अशी आघाडी घेतली. दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची रॅली पाहायला मिळाली, परंतु प्रत्येक वेळी समीर वरचढ ठरला. त्याने हाही गेम २१-१३ असा जिंकून जेतेपद नावावर केले.

या हंगामातील त्याचे हे पहिलेच जेतेपद असून किदम्बी श्रीकांत (२०१५) आणि एच. एस. प्रणॉय (२०१६) यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारा तो तिसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.  महिलांमध्ये सायना नेहवालने २०११ आणि २०१२ मध्ये स्विस खुली स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.