इंग्लंडविरुद्ध श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीवर माजी अनुभवी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेमध्ये लंकेला ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. तिन्ही सामन्यांमध्ये श्रीलंकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती आणि इंग्लिश संघ त्यांच्यावर वर्चस्व गाजवताना दिसत होता.

कार्डिफमधील तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेला ७ बाद १२९ धावा करता आल्या. श्रीलंकेसाठी दासुन शनाका हा एकमेव फलंदाज होता, ज्याने अर्धशतक ठोकून आपल्या कौशल्याची झलक दाखवली. इंग्लंडने१७.१ षटकातच या लक्ष्याचा पाठलाग केला. दुसर्‍या टी २० सामन्यातही लंकेनेन इंग्लंडला १११ धावांचे लक्ष्य दिले. इंग्लंडने हा सामना पाच गडी राखून सहज जिंकला. तिसर्‍या टी-२० मध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेला ९१ धावा करता आल्या.

 

हेही वाचा – काय करावं या प्रेक्षकाचं..? चालू क्रिकेट सामन्यात महिलेशी केलं असभ्य वर्तन!

श्रीलंकेचा हा टी-२० मालिकेतील सलग पाचवा पराभव आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला समोर ठेऊन केवळ जयसूर्याच नव्हे, तर अनेक दिग्गज व्यक्तींनी श्रीलंकेच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्यानेही संघाच्या खराब कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. ”देशातील क्रिकेटचा खेळ वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांना काही कठोर पावले उचलण्याची गरज आहे. श्रीलंकेच्या क्रिकेटसाठी अतिशय वाईट दिवस आहे. परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे”, असे ५१ वर्षीय जयसूर्याने ट्वीट केले.

जयसूर्याची कारकीर्द

जयसूर्याची गणना देशातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आपल्या कारकीर्दीत ११० कसोटी, ४४५ एकदिवसीय आणि ४१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी सामन्यात त्याने १४ शतके आणि ३१ अर्धशतकांच्या मदतीने एकूण ६९७३ धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यांत त्याने २८ शतके आणि ६८ अर्धशतकांच्या मदतीने एकूण १३४३० धावा केल्या आहेत.