संदीप चव्हाण, महाराष्ट्राच्या कुमारी खो-खो संघाचे प्रशिक्षक

ऋषिकेश बामणे

रांची येथे झालेल्या राष्ट्रीय उपकनिष्ठ खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे या स्पर्धेत कुमारी संघाकडूनही कोणाला विजयाची फार अपेक्षा नव्हती. परंतु दडपणाच्या परिस्थितीतही आमच्या संघाने दमदार कामगिरी करून विजेतेपद मिळवल्यामुळे मला माझ्या संघाचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या कुमारी संघाचे प्रशिक्षक संदीप चव्हाण यांनी व्यक्त केली.

सुरत येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ खो-खो स्पर्धेत संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्यांदा, तर एकंदर सलग सहाव्यांदा महाराष्ट्राच्या कुमारी संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. गतवर्षी भोपाळला झालेल्या स्पर्धेतही संदीप यांनी महाराष्ट्राला यशस्वी मार्गदर्शन केले होते. पुण्याच्या रांजणी खेडेगावातील नरसिंह क्रीडा मंडळात अनेक प्रतिभावान खो-खोपटूंना घडवणाऱ्या संदीप यांच्याशी या स्पर्धेतील महाराष्ट्राची कामगिरी आणि भविष्यातील योजनांविषयी केलेली ही खास बातचीत-

* तुमच्या प्रशिक्षणाखाली महाराष्ट्राने सलग दुसऱ्यांदा कुमारी गटाचे विजेतेपद मिळवले, त्याविषयी काय सांगाल?

निश्चितच प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. खरे सांगायचे तर, महाराष्ट्राच्या कुमारी संघाकडून यावेळी कुणालाही विजेतेपदाची अपेक्षा नव्हती. सुरतला रवाना झाल्यानंतर मला अनेकांनी महाराष्ट्राला अन्य संघापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, त्यांना कोणीही पराभूत करू शकतो, असा इशारा दिला. परंतु मला माझ्या संघातील खेळाडूंवर विश्वास होता आणि त्यांनी संपूर्ण स्पर्धेत दडपणाखालीही संयमी खेळ करून स्वत:ला सिद्ध केल्यामुळेच मला माझ्या संघाचा अभिमान वाटतो. विशेषत: पावसाच्या व्यत्ययामुळे आम्ही एकाच दिवशी उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना खेळलो. त्यातूनच आमच्या संघातील खेळाडूंची जिद्द आणि खेळाविषयीची निष्ठा दिसून येते.

* डहाणूला झालेल्या सराव शिबिराचा स्पर्धेच्या तयारीकरिता कशाप्रकारे फायदा झाला?

१३ ऑक्टोबर रोजी ठाण्याला राज्य निवड चाचणी स्पर्धा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली. त्यानंतर १७ तारखेपर्यंत डहाणू येथे झालेल्या सराव शिबिरात मी प्रामुख्याने सर्व खेळाडूंना एकत्र वेळ कसा घालवता येईल, याकडे लक्ष दिले. गेल्या वर्षीच्या संघातील तीनच खेळाडू यावेळच्या संघात होते, त्यामुळे बहुतांशी नव्या खेळाडूंच्या दमावरच आम्ही संघबांधणी केली. प्रत्येकाचा खेळ ओळखून त्याला योग्य न्याय देणे, हे एक आव्हान होते. परंतु ते आव्हान समर्थपणे पेलण्यात मी यशस्वी ठरलो.

* आगामी आव्हानांच्या दृष्टीने काही योजना आखली आहे का?

सध्या तरी मला नेमण्यात आलेली कुमारी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका यशस्वीपणे निभावल्यामुळे येणाऱ्या कोणत्याही आव्हानांसाठी मी सज्ज आहे. परंतु राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान निदर्शनास आलेली एक बाब म्हणजे, गेल्या एक-दोन वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धा मॅटवर खेळवण्यात येतात. याविषयी खेळाडूंना कल्पना असली तरी, त्यांना सराव मात्र मातीवरच करावा लागतो. त्यामुळे प्रत्यक्षात सामन्याच्या वेळी पायात बूट घालून मॅटवर धावताना अंदाज चुकू शकतो. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांतील अकादम्यांमध्ये बूट घालूनच मॅटवर सराव करण्याची संधी दिल्यास खेळाडूंसाठी सोयीस्कर ठरेल, असे मला वाटते.

* खो-खोच्या विकासासाठी आणखी कोणती पावले उचलणे आवश्यक आहेत?

फेब्रुवारी २०२०मध्ये रंगणारी अल्टिमेट खो-खो स्पर्धा खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी फारच लाभदायक ठरणार आहे. मात्र मुलांव्यतिरिक्त मुलींसाठीसुद्धा ही लीग खेळवण्यात यावी, अशी माझी अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी या खेळाने वेगळी उंची गाठली, त्याचप्रमाणे अल्टिमेट लीगमुळे खो-खोसुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, याची मला खात्री आहे.