लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेची पात्रता निश्चित

हरयाणाच्या संदीप कुमारने राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीतील ५० किलोमीटर प्रकारात स्वत:च्याच नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम शनिवारी मोडला. संदीपने तीन तास ५५ मिनिटे आणि ५९.०५ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली आणि ऑगस्ट महिन्यात लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेची पात्रता मिळवली. याआधी संदीपने मे २०१४ रोजी चीनमध्ये झालेल्या आयएएएफ विश्व चालण्याच्या शर्यतीत ३ तास ५६ मिनिटे २२ सेकंदांची वेळ नोंदवली होती.

शनिवारी झालेल्या शर्यतीत सेना दलाच्या जितेंदर सिंगने (४:०२:११.५८) रौप्य, तर चंदन सिंगने (४:०४:१८.४१) कांस्यपदक जिंकले. या कामगिरीसह जितेंदर आणि चंदन यांनीही ४ ते १३ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेचे तिकीट पटकावले. जागतिक स्पध्रेसाठी ४ तास ०६ मिनिट ही पात्रता वेळ ठरवण्यात आली होती.

‘‘स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडून ही शर्यत जिंकल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे आणि त्यात जागतिक अजिंक्यपद स्पध्रेची पात्रता निश्चित झाल्याने अधिक भर पडली आहे. भविष्यात कामगिरीत अधिक सुधारणा करून वेळेत सुधारणा करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली आहे,’’ असे संदीप म्हणाला.

खुशबीर कौर, मनीष सिंग रावत यांची ऐनवेळी माघार

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाला (एएफआय) कोणतीही कल्पना न देता महिला शर्यतपटू खुशबीर कौर (२० किमी.) आणि मनीष सिंग रावत यांनी स्पध्रेतून माघार घेतली.

या स्पध्रेतून आशियाई चालण्याच्या शर्यतीत प्रवेश मिळवण्याची संधी या दोघांना होती. ही स्पर्धा २० मार्च रोजी जपान येथे होणार आहे. पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतील अव्वल तिन्ही खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद स्पध्रेचे (१ तास २४ मिनिटे) पात्रता निकष पूर्ण केले.

राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या सेना दलाच्या के. टी. इरफानने १ तास २२ मिनिटे व ४३.४८ सेकंदांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. सेना दलाच्याच देवेंदर (१:२२:४३.५९) आणि के. गणपती (१:२२:५७.८६ ) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.

महिला गटात राष्ट्रीय विक्रमधारी खुशबीरच्या अनुपस्थितीत ओएनजीसीच्या प्रियांकाने २० किमी शर्यत १ तास ३७ मिनिटे व ५८.३२ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. रेल्वेच्या शांती कुमारी (१:३८:३८.७०) आणि राणी यादव (१:३८:५१.३०) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक निश्चित केले. मात्र, यापैकी एकही जण जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठी पात्र ठरला नाही.

 

पूर्व विभागाला जेतेपद; पश्चिम विभागावर विजय; मध्य विभागाचा विजयी निरोप

मुंबई : विराट सिंगच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर पूर्व विभागाने ८ विकेट्स राखून पश्चिम विभागावर मात केली आणि सय्यद मुश्ताक अली आंतरविभागीय ट्वेन्टी-२० लीगच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पध्रेत अपराजित राहून पूर्व विभागाने अजिंक्यपद पटकावले. मध्य विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यातील अखेरच्या साखळी सामन्यात मध्य विभागाने २ विकेट्स राखून विजय मिळवला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात पूर्व विभागाने प्रथम क्षेत्ररक्षण करून पश्चिम विभागाला निर्धारित २० षटकांत ५ बाद १४९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. पश्चिमेच्या शेल्डन जॅक्सनने ४४ चेंडूंत ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रुजूल भटने २० चेंडूत ३६ धावा कुटून पश्चिम विभागाच्या धावसंख्येत भर घातली. प्रत्युत्तरात पूर्व विभागाने हे लक्ष्य १३.४ षटके व ८ विकेट्स राखून सहज पार केले. झारखंडचा १९ वर्षीय विराट सिंगने ३४ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकार खेचून नाबाद ५८ धावांची खेळी केली. इशांक जग्गीने ३० चेंडूंत ५६ धावा चोपून त्याला चांगली साथ दिली. इशांकच्या अर्धशतकी खेळीत ६ खणखणीत षटकार आणि ३ चौकारांचा समावेश आहे.

संक्षिप्त निकाल

  • पश्चिम विभाग : ५ बाद १४९ (शेल्डन जॅक्सन ५२, रुजूल भट ३६; प्रीतम दास २/२५) पराभूत वि. पूर्व विभाग : १३.४ षटकांत २ बाद १५३ (विराट सिंग नाबाद ५८, इशांक जग्गी ५६; शार्दुल ठाकूर २/३१); दक्षिण विभाग : ७ बाद १८१ (विष्णू विनोद ३१, दिनेश कार्तिक ३५, विजय शंकर ४०, पवन देशपांडे नाबाद ३३; अंकित राजपूत २/२८, अनिकेत चौधरी २/३६, कर्ण शर्मा २/३१) पराभूत वि. मध्य विभाग : ८ बाद १८४ (अमनदीप खरे ३९, हरप्रीत सिंग ९२; राहिल शाह २/२०).