वर्ल्डकपमध्ये आता संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर अंबाती रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रायुडूच्या निवृत्तीच्या निर्णयावरुन अनेकांनी एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीवर जोरदार टीका केली असून रायुडूवर अन्याय झाल्याची अनेकांची भावना आहे. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी प्रमुख संदीप पाटील यांनी सुद्धा निवड समितीच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत.

रायुडूच्या निवृत्तीचा निर्णय दुर्देवी आहे. रायुडूला सावत्र असल्यासारखी वागणूक दिली. हा विषय खूप चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आला अशी प्रतिक्रिया संदीप पाटील यांनी मिड डे शी बोलताना दिली. वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात रायुडूचा समावेश करण्यात आला नव्हता. पण भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्यांच्या जागी रायुडूची निवड शक्य होती.

विजय शंकरला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी मयांक अग्रवालची निवड करण्यात आली. मयांक सुद्धा चांगला खेळाडू आहे. पण म्हणून इतरांबरोबर न्याय झाला असे म्हणता येणार नाही. वर्ल्डकपसाठी मी संघ निवडला असता तर रायुडू नक्कीच त्यामध्ये असता असे संदीप पाटील म्हणाले.

संदीप पाटील १९७९-८० ते १९८४-८५ पर्यंत भारतीय संघाकडून खेळले. आक्रमक फलंदाज अशी त्यांची ओळख होती.  पाटील भारतीय अ संघाचे प्रशिक्षक होते. त्या संघांमध्ये रायुडू होता. रायुडूला भारतीय संघाकडून २०१३ साली पहिल्यांदा संधी मिळाली तेव्हा संदीप पाटील निवड समितीचे प्रमुख होते.