हॉकी इंडिया लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही भारताचा ऑलिम्पिक ड्रॅगफ्लिकर संदीपसिंग याला आगामी हीरो चषक जागतिक लीग दुसऱ्या फेरीच्या स्पर्धेकरिता भारतीय संघात स्थान मिळाले नाही. ही स्पर्धा येथे १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान येथे होणार आहे.
लंडन ऑलिम्पिक स्पर्धेनंतर संदीपला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये त्याने आतापर्यंत ११ गोल करीत सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळविला आहे, मात्र त्याची ही कामगिरी त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान देण्यासाठी अपुरी ठरली आहे. त्याला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सरदारासिंग याच्याकडे देण्यात आले आहे तर व्ही. आर. रघुनाथ हा उपकर्णधार सांभाळणार आहे. सईद अली, हरविंदरसिंग व मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांच्या समितीने हा संघ निवडला आहे. संघातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये आशियाई उपविजेत्या संघातील गुरमेलसिंग, एस. के. उथप्पा, आकाशदीपसिंग व युवराज वाल्मीकी यांचा समावेश आहे. त्यांच्याऐवजी गुरजिंदरसिंग, मलिकसिंग, मनदीपसिंग, चिंगलेनसानासिंग कांगुजम यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघास ओमान (२० फेब्रुवारी), आर्यलड (२१ फेब्रुवारी), चीन (२३ फेब्रुवारी) व बांगलादेश (२४ फेब्रुवारी) यांच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
भारतीय संघ-गोलरक्षक-पी. आर. श्रीजेश, पी. टी. राव. फुलबॅक- व्ही. आर. रघुनाथ (उपकर्णधार), रूपींदरपालसिंग, हरबीरसिंग. मध्यरक्षक- बीरेंद्र लाक्रा, मनप्रीतसिंग, कोठाजितसिंग, सरदारासिंग (कर्णधार), गुरजिंदरसिंग. आघाडी फळी-दानिश मुस्तफा, नितीन थिमय्या, मनदीपसिंग, मलिकसिंग, एस. व्ही. सुनील, चिंगलेनासानासिंग, धरमवीरसिंग, गुरविंदरसिंग चंडी. राखीव खेळाडू- सुशांत तिर्की, संदीपसिंग, एम. बी. अय्यप्पा, गुरमेलसिंग, आकाशदीपसिंग, इम्रानखान.