आक्रमकतेने खेळणार असल्याचा गाजावाजा करत भारतीय संघ श्रीलंकेची शिकार करायला गेला खरा, पण भारतीय संघांचीच पहिल्या सामन्यात शिकार झाल्याचे पाहायला मिळाले. आता दुसऱ्या सामन्यात अधिक आक्रमण करून मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारताचा संघ प्रयत्नशील असेल. दुसरीकडे आपल्या लाडक्या कुमार संगकाराला विजयाने हृद्य निरोप देण्यासाठी श्रीलंकेचा संघ सज्ज झाला आहे. त्यामुळे कोणता संघ आक्रमण करत सामना जिंकेल, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
पहिल्या सामन्यात दमदार आघाडी घेतल्यावरही भारताला पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार विराट कोहली आणि संघ संचालक रवी शास्त्री यांनी आम्ही आक्रमक खेळणार असल्याचे सांगितले असले तरी संघाच्या कोणत्याही विभागामध्ये आक्रमकता दिसत नाही. भारतीय संघाची एकेकाळी फिरकीवर खेळण्याची मातबरी होती, पण गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजीवर धारातीर्थी पडताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रंगना हेराथ आणि कौशल यांनी भारतीय फलंदाजांना दुसऱ्या डावात चांगलेच नाचवले होते. शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. दुखापतीमुळे धवन या सामन्यात खेळणार नसल्यामे भारतापुढील समस्या आणखीन वाढलेल्या दिसत आहेत. कारण रोहित शर्माला अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. दोन्ही डावांमध्ये तो वाईटपद्धतीने बाद झाला होता. धवनच्या जागी चेतेश्वर पुजारा संघात स्थान मिळणार असून त्याच्यासाठी ही एक चांगली संधी असेल. युवा लोकेश राहुल आणि वृद्धिमान साहा यांनादेखील कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवण्याची ही नामी संधी असेल. अजिंक्य रहाणेला पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नसली तरी त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. गोलंदाजीमध्ये पहिल्या डावात आर. अश्विनने चमकदार कामगिरी केली होती. पण अनुभवी हरभजन सिंगला मात्र पुनरागमन करताना आपली छाप पाडता आलेली नाही. वेगवान गोलंदाजांनाही आतापर्यंत कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. साहा अननुभवी असला तरी त्याच्याकडून सोपे झेल सुटत असल्याने त्याला आपल्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे.
पिछाडीवर असताना श्रीलंकेने पहिल्या सामन्यात दमदार विजयाची नोंद केली होती. या विजयात यष्टिरक्षक दिनेश चंडिमलचा मोलाचा वाटा होता. कारण त्याने दुसऱ्या खेळीत साकारलेल्या नेत्रदीपक शतकाच्या जोरावरच श्रीलंकेला भारतापुढे चांगले आव्हान ठेवता आले होते. पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूजनेही चांगली फलंदाजी केली होती. फिरकीपटू हेराथ आणि कौशल यांनी दुसऱ्या डावात टिच्चून मारा केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून संघाला कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा असेल. संगकाराने श्रीलंकेला बरेच विजय मिळवून दिले आहेत. कारकीर्दीतील अखेरच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष असेल.
पहिला सामना ज्यापद्धतीने श्रीलंकेने जिंकला ते पाहता त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. दुसरीकडे भारताने हा सामना गमावला असला तरी आपल्या चुका शोधून काढून दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी ते उत्सुक असतील. त्यामुळे हा सामनादेखील रंजक होईल, अशी आशा साऱ्यांना आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, हरभजन सिंग, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरोन आणि स्टुअर्ट बिन्नी.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुमार संगकारा, लहिरू थिरीमाने, कौशल सिल्व्हा, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कुशल परेरा, रंगना हेराथ, दिरुवान परेरा, थरिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्वा फर्नाडो, दुशमंथा चमिरा.
वेळ : सकाळी १०.०० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनीवर.