विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातील चौथ्या दिवशी भारताच्या संग्राम दहियाने पुरुषांच्या दुहेरी ट्रॅप प्रकारात रौप्यपदक  पटकावले. याचप्रमाणे अमनप्रीत सिंगने पदार्पणातच कांस्यपदक मिळवण्याची किमया साधली आहे. जितू रायला मात्र खराब कामगिरीमुळे सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर सुरू असलेल्या या स्पर्धेत संग्रामने ८० लक्ष्यांपैकी ७६ लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. सुवर्णपदक विजेत्या हू बिनयुआनने (७९) त्याच्यापेक्षा तीन लक्ष्ये अधिक साधली. २००९मध्ये कनिष्ठ आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संग्रामचे वरिष्ठ गटातील हे पहिले पदक आहे.

पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात विश्वचषक रौप्यपदक विजेत्या अमनप्रीतने २०२.२ गुण मिळवून कांस्यपदक पदक मिळवले. याचप्रमाणे १२३.२ गुण मिळवणाऱ्या रायला अंतिम फेरीत सातवा क्रमांक मिळाला. याआधी दोघांनीही पात्रतेचा अडथळा आरामात पार केला. सर्बियाच्या दमिर मायकेकने २२९.३ गुणांसह सुवर्णपदक मिळवले.

युक्रेनच्या ओलीह ओमेलच्यूकने २२८ गुणांसह रौप्यपदक पटकावले. कांस्यपदकाच्या शर्यतीत अमनप्रीतने युसूफ डिकेस (टर्की) आणि दिमित्रिजे ग्रिजिक (सर्बिया) यांना मागे टाकले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले वैयक्तिक पदक ठरले. याचप्रमाणे जितू राय आणि हिना सिंधू यांनी १० मीटर मिश्र एअर पिस्तूल प्रकारात पहिल्याच दिवशी सुवर्णपदक जिंकले होते.

विश्वचषकाचा हा अंतिम टप्पा असल्यामुळे जगातील सर्वोत्तम नेमबाज स्पर्धेत होते. त्यामुळे नेमबाजीतील ही माझी सर्वोत्तम कामगिरी असा उल्लेख तुम्ही करू शकता. मी आनंदित आहे, परंतु समाधानी नाही. त्यामुळे कामगिरी आणखी सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

-अमनप्रीत सिंग