भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाला शनिवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मरुण रंगाची साडी आणि ब्ल्यू रंगाचा ब्लेझर या वेशात अवतरलेल्या सानियाला पदक, प्रमाणपत्र आणि साडेसात लाख रुपये पुरस्कार म्हणून देण्यात आले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सानियाला दरबार सभागृहात हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते. लिएण्डर पेसनंतर खेलरत्न पुरस्कार पटकावणारी सानिया ही टेनिसमधील दुसरी खेळाडू आहे. काही पुरस्कारांच्या निवडीबाबत आक्षेप घेतले गेल्याने क्रीडा मंत्रालय याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढत आहे.
अभिलाषासह अर्जुन पुरस्कार विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले. अभिलाषाने २०१२च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते, तर गतवर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातही तिचा समावेश होता.
अर्जुन पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमाला क्रिकेटपटू रोहित शर्मा, बॉक्सिंगपटू मनदीप जांग्रा, धावपटू एम. आर. पुवम्मा हजर राहू शकले नाहीत. निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. बाली यांच्या नेतृत्वाखालील समितीने १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस केली होती.

खेलरत्न हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामातील उर्वरित स्पर्धामध्ये आणि विशेषत: ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. यंदाच्या हंगामात माझी कामगिरी चांगली झाली आहे. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान आणि विम्बल्डन जेतेपद कारकीर्दीतील संस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा अवघ्या काही तासांवर आली आहे. त्यासाठी कसून मेहनत केली आहे.
-सानिया मिर्झा, खेलरत्न पुरस्कारप्राप्त टेनिसपटू

पुरस्काराने प्रचंड आनंद झाला आहे. कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण व आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. काहीसा अनपेक्षित, मात्र खूप समाधान देणारा क्षण आहे. कबड्डीपटू झाल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे. कबड्डीचे मैदान, गुरू आणि आईवडील यांना या पुरस्काराचे श्रेय जाते. पुरस्काराने प्रोत्साहन मिळाले असून, देशासाठी आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.
-अभिलाषा म्हात्रे, अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू

पुरस्कार विजेते
> राजीव गांधी खेलरत्न : सानिया मिर्झा (टेनिस)
> अर्जुन पुरस्कार : जितू राय (नेमबाज), दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक), पी. आर. श्रीजेश (हॉकी), बबिता, बजरंग (कुस्ती), संदीप कुमार (तिरंदाजी), रोहित शर्मा (क्रिकेट), के. श्रीकांत (बॅडमिंटन), स्वर्ण सिंग विर्क (नौकायन), सतीश शिवलिंगम (वेटलिफ्टिंग), संथोई देवी (वुशू), शरद गायकवाड (पॅरासेलिंग), एम. आर. पुवम्मा (अ‍ॅथलेटिक्स), मनजित चिल्लर, अभिलाषा म्हात्रे (कबड्डी), अनुप कुमार यामा (रोलर स्केटिंग)

> द्रोणाचार्य पुरस्कार : नवल सिंग (पॅराअ‍ॅथलेटिक्स), अनुप सिंग (कुस्ती), हरबन्स सिंग (अ‍ॅथलेटिक्स जीवनगौरव), स्वतंतर राज सिंग (बॉक्सिंग जीवनगौरव), निहार अमीन (जलतरण जीवनगौरव)
> ध्यानचंद पुरस्कार : रोमिओ जेम्स (हॉकी), शिव प्रकाश मिश्रा (टेनिस), टी. पी. पी. नायर (व्हॉलीबॉल)