यंदाच्या हंगामात स्वप्नवत सूर गवसलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली. या विजयासह जोडीने सलग २० सामन्यात अपराजित राहण्याचा विक्रम नावावर केला.

अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने दीड तास चाललेल्या लढतीत चौथ्या मानांकित तिमेआ बाबोस आणि क्रिस्तिना लाडेनोव्हिक जोडीवर ६-४, ७-५ अशी मात केली. यंदाच्या वर्षी रोम खुल्या स्पर्धेत तिमेआ-क्रिस्तिना जोडीने सानिया-मार्टिना जोडीवर विजय मिळवला होता. शुक्रवारी विजय मिळवत सानिया-मार्टिना जोडीने गेल्या वर्षीच्या पराभवाची परतफेड केली.
सानिया-मार्टिना जोडीने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये ४-४ तर दुसऱ्या सेटमध्ये ५-५ अशी स्थिती असताना या जोडीला ब्रेकपॉइंटची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा उठवत या जोडीने सरशी साधली.
‘प्रत्येक सामन्यात कामगिरीत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या जोडीविरुद्ध आम्ही आधी खेळलो होतो. त्यामुळे त्यांच्या खेळाची माहिती होती,’ असे सानियाने सांगितले. या जोडीने यंदाच्या हंगामात एकत्र खेळताना आठ जेतेपदांवर नाव कोरले आहे. यामध्ये दोन ग्रँड स्लॅम जेतेपदांचा समावेश आहे.
उपांत्य फेरीच्या लढतीत सानिया-मार्टिनाची लढत चान हाओ चिंग आणि चान युंग जान यांच्याशी होणार आहे. वर्षांतील कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत अव्वल आठमध्ये असणाऱ्या खेळाडूंनाच या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. जगातील सर्वोत्तम महिला दुहेरीची जोडी असल्याचे सिद्ध करण्यापासून सानिया-मार्टिना जोडी केवळ दोन विजय दूर आहेत.