जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. अटीतटीच्या व दीड तास चाललेल्या लढतीत या जोडीने एलेना व्हेसनिना व एकाटेरिना माकारोव्हा जोडीवर ६-१, ६(५)-७, १०-३ अशी मात केली.

या जोडीचे यंदाच्या हंगामातील हे पाचवे जेतेपद आहे. या जोडीने सिडनी, ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसह सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. क्ले कोर्टवर या जोडीने पटकावलेले हे पहिलेच जेतेपद आहे. पुढील आठवडय़ात सुरु होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर सानिया-मार्टिना जोडीचे जेतेपद त्यांचा आत्मविश्वास उंचावणारे आहे.

सानिया-मार्टिना जोडीने आक्रमक खेळ करत २४ मिनिटात पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र रशियाच्या जोडीने आपला खेळ उंचावत टक्कर देत बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये केवळ १२ मिनिटात प्रतिस्पध्र्याचा धुव्वा उडवत या जोडीने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.