नव्या वर्षांत अनुभवी मार्टिना हिंगिससह खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या सानिया मिर्झाने मियामी टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अव्वल मानांकित सानिया-हिंगिस जोडीने रशियाच्या एकाटेरिना माकारोव्हा आणि एलेना वेसनिना जोडीवर ७-५, ६-१ असा विजय मिळवला. सानियाच्या कारकीर्दीतील हे विक्रमी २५वे जेतेपद आहे.

पहिल्या गेममध्ये सानिया-हििगस जोडी २-५ अशी पिछाडीवर होती, मात्र यानंतर जिद्दीने खेळ करत त्यांनी सलग आठ गुणांची कमाई केली. सानिया-हिंगिस जोडीने माकारोव्हा-वेसनिना जोडीला नमवतच इंडियन वेल्स स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले होते. हिंगिससह खेळण्याचा निर्णय घेतल्यापासून सानियाने एकही सेट गमावलेला नाही.

दरम्यान, सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी दिलेल्या उपयुक्त सूचनांमुळेच हा सामना जिंकू शकलो, असे मार्टिना हिंगिसने सांगितले. ‘‘आम्ही आमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. माकारोव्हा-वेसनिना तुल्यबळ जोडी आहे. अख्ख्या सामन्याच्याऐवजी एकेक गुणाचा आम्ही विचार केला आणि म्हणूनच जिंकलो,’’ असे हिंगिसने पुढे सांगितले. हे जेतेपद हिंगिसच्या कारकीर्दीतील दुहेरीचे ४३वे जेतेपद आहे. या जेतेपदासह सानिया-हिंगिस जोडी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेणार आहे.

 अव्वल स्थान सानियाच्या दृष्टिक्षेपात
अनुभवी मार्टिना हिंगिससह खेळण्याचा निर्णय सानिया मिर्झाला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी मिळवून देऊ शकतो. सानियाने हिंगिससह मियामी टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या जेतेपदासह सानियाने १००० क्रमवारी गुणांची कमाई केली. क्रमवारीत सानिया तिसऱ्या स्थानी स्थिर आहे. मात्र मियामी जेतेपदासह मिळालेल्या गुणांमुळे अव्वल स्थानापासून सानिया केवळ १४५ गुण दूर आहे. इटलीची सारा इराणी आणि रॉबर्टा व्हिन्सी प्रत्येकी ७६४० गुणांसह अव्वल स्थानी आहेत. सलग दुसऱ्या जेतेपदासह सानिया आता ७४९५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. या आठवडय़ातच चार्ल्सटोन होणाऱ्या फॅमिली सर्कल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यास सानिया अव्वल स्थानी विराजमान होऊ शकते. सानिया-हिंगिस जोडी या स्पर्धेसाठी अव्वल मानांकित आहे. मात्र ही स्पर्धा ग्रास कोर्टवर होणार असून, या स्वरूपाच्या कोर्टवर एकत्रित खेळण्याचा अनुभव या जोडीकडे नाही. मात्र २०११ मध्ये एलेना वेसनिनासह खेळताना सानियाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. नव्या वर्षांत नव्या ऊर्जेसह खेळणाऱ्या सानियाने सध्याचा झंझावाती फॉर्म कायम राखल्यास क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेण्याचे तिचे स्वप्न प्रत्यक्षात साकारू शकते.