News Flash

हम साथ ‘सात’ है! सानिया मिर्झा-मार्टिना हिंगिस जोडीला सातवे विजेतेपद

रोमानिआच्या इरिना कॅमेलिआ बेगू आणि मोनिका निकालेस्क्यू जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला.

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीने यंदाच्या मोसमातील विजयी घोडदौड सुरू ठेवली असून शनिवारी त्यांनी वुहान खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.

यंदाच्या हंगामात झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने वुहान टेनिस स्पर्धेतही हम साथ ‘सात’ है या उक्तीचा प्रत्यय घडवत सातव्या जेतेपदाला गवसणी घातली.

अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने रोमानिआच्या इरिना कॅमेलिआ बेगू आणि मोनिका निकालेस्क्यू जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला. या जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली होती. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही या जोडीने सहज विजय मिळवला. अंतिम लढतीत मात्र या जोडीला विजयासाठी संघर्ष करावा लागला. सानिया-हिंगिस जोडीने तीन वेळा आपली सव्‍‌र्हिस गमावली. दुसऱ्या सेटमध्ये ०-२ अशा पिछाडीवरून पुनरागमन करत त्यांनी विजय साकारला.

एकत्र खेळताना शेवटच्या १३ लढतींमध्ये या जोडीने एकही सेट गमावलेला नाही. आता ही जोडी चीन खुल्या स्पर्धेत सहभागी होणार असून, या स्पर्धेतही त्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

 

सानिया-हिंगिसची सात जेतेपदे

*  इंडियन वेल्स

* मियामी

* चार्ल्सटन

* विम्बल्डन

* अमेरिकन

* गुआंगझाऊ

* वुहान

 

व्हीनस विल्यम्सला जेतेपद

सेरेना विल्यम्सच्या झंझावातामध्ये झाकोळून गेलेल्या व्हीनस विल्यम्सने वुहान टेनिस स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत गार्बिन म्युग्युरुझाने माघार घेतल्यामुळे व्हीनसला विजयी घोषित करण्यात आले.

व्हीनसने सहजपणे पहिला सेट जिंकला होता. दुसऱ्या सेटमध्ये ३-० अशी आघाडीवर असताना गार्बिनने दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. कारकिर्दीतील व्हीनसचे हे ४७वे जेतेपद आहे. तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर व्हीनसला डब्ल्यूटीए प्रीमिअर दर्जाच्या स्पर्धेत जेतेपदाची कमाई केली आहे. अंतिम लढतीत पायाच्या दुखापतीने सतावले असतानाही व्हीनसने निग्रहपूर्वक खेळ केला. या जेतेपदामुळे व्हीनसचा जागतिक क्रमवारीत अव्वल वीसमध्ये धडक मारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे वर्षअखेरीस होणाऱ्या डब्ल्यूटीए अजिंक्यपद स्पर्धेसाठी ती पात्र ठरू शकते. २००९ नंतर व्हीनस या स्पर्धेत खेळू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 4:35 pm

Web Title: sania mirza martina hingis clinch seventh wta title of the season at wuhan open
टॅग : Sania Mirza,Tennis
Next Stories
1 .. असे पाहुणे येती! दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात विकेट्सने विजय
2 उमेश यादवचे दमदार शतक
3 इंडियन सुपर लीग स्पर्धा : गतविजेत्यांचा उत्साह बुलंद!
Just Now!
X